१,०९५ दिवस १ रुपयाची नाणी जमा करुन ड्रीम बाईक घेतली!! ही चिल्लर मोजायला १० तास लागले!

१,०९५ दिवस १ रुपयाची नाणी जमा करुन ड्रीम बाईक घेतली!! ही चिल्लर मोजायला १० तास लागले!

थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण प्रत्येक जण ऐकतो आणि वापरतो. याचा प्रत्यय प्रत्येकाला वेळोवेळी येत असतो. पण तमिळनाडूतील एका मुलाने ही म्हण खरोखर खरी करून दाखवली आहे. रुपये रुपये जोडून मी एखादी गोष्ट खरेदी केली असे सांगणारे ऐकले असतात. पण हा मुलगा खरोखर एकेक रुपया गोळा करून बाईक घेऊन आला आहे.

तामिळनाडूच्या सेलम येथे व्ही. बुबथी नावाच्या मुलाच्या मनात बजाजची डॉमीनार ४०० ही गाडी घ्यायचीच असे भूत घुसले होते. या मुलाने मग रोज एकेक रुपया गल्ल्यात जमा करण्यास सुरुवात केली. तब्बल ३ वर्ष असे पैसे जमा करून शेवटी पठ्ठ्या शोरूमला पोहोचलाच. तिथे शोरूमच्या कर्मचाऱ्यांना ही चिल्लर मोजायला १० तास लागले.

बुबाथी हा बीसीए पदवीधर आहे. ४ वर्षांपूर्वी तो एके ठिकाणी कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून काम करत होता. पण नंतर त्याने युट्यूब चॅनेल सुरू केले. या कमाईमधून येणारे पैसे इतरत्र खर्च व्हायला नकोत म्हणून मग तो चिल्लर स्वरूपात साठवून ठेऊ लागला. त्यावेळी या डॉमीनारची किंमत २ लाख होती. त्यावेळी त्याच्याकडे एवढे पैसे काही अर्थातच नव्हते.

मग तो हळूहळू पैसे जमा करत गेला. पण गाड्यांच्या किंमतीही वाढत होत्या. एके दिवशी त्याला समजले की या बाईकची किंमतसुद्धा वाढणार आहे. त्याने लागलीच बाईकची किंमत काढली आणि लगेच स्वतःकडे किती पैसे जमले हे चेक केले. सगळा ताळेबंद काढून झाल्यावर मग भावाचे स्वप्न पूर्ण झाले.

या भावाची पॅशन बघून चिल्लर मोजण्याचे चार्जेस पण संबंधितानी घेतले नाहीत. अशाप्रकारे पै-पै जोडून या भावाने स्वतःचे सस्वप्न पूर्ण करून दाखवले आहे.

उदय पाटील