आयपीएल २०२२ स्पर्धेतील चौथा सामना सोमवारी (२८ मार्च) पार पडला. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे दोन्ही नवे संघ आमने सामने होते. या सामन्यात केएल राहुल बाद झाल्यानंतर लखनऊ सुपरजायंट्स संघ अडचणीत सापडला होता. त्यावेळी असे वाटू लागले होते की, लखनऊ सुपरजायंट्स संघ मोठी धावसंख्या उभारू शकणार नाही. परंतु त्यानंतर २२ वर्षीय आयुष बदोनी मैदानावर आला आणि त्यानंतर सामन्याचे चित्र पालटले. संघ अडचणीत असताना त्याने ४१ चेंडूंमध्ये ५४ धावांची खेळी केली. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या सर्वांच्या तोंडावर एकच नाव होते, ते म्हणजे आयुष...आयुष. एकाच खेळीमुळे स्टार झालेला आयुष आहे तरी कोण? चला जाणून घेऊया.
गुजरात संघाविरुद्ध तुफानी अर्धशतकी खेळी करणारा आयुष बदोनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो. तसेच अंडर १९ क्रिकेटमध्ये त्याने श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात १८५ धावांची खेळी केली होती. गुजरात संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात जेव्हा तो फलंदाजीला आला त्यावेळी संघाची धावसंख्या ४ गडी बाद २९ धावा होती. त्यानंतर आयुषने तुफानी खेळी केली आणि लखनऊ संघाला १५६ धावांपर्यंत मजल मारता आली.
कोण आहे आयुष बदोनी?
२२ वर्षीय आयुष बदोनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करतो. तो एक गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू आहे. भारतीय १९ वर्षाखालील संघासाठी खेळताना त्याने श्रीलंका संघाविरुद्ध १८५ धावांची खेळी केली होती. त्याने ४ दिवसीय सामन्यात गोलंदाजी करताना त्याने ९.३ षटकात २४ धावा खर्च करत ४ गडी बाद केले होते. तसेच सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन त्याने २०२ चेंडूंचा सामना करत १८५ धावांची खेळी केली होती. या खेळी नंतर तो चर्चेत आला होता.
लखनऊने २० लाखांची बोली लावत दिले संघात स्थान
आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्स संघाने त्याला २० लाखांच्या मूळ किमतीत संघात स्थान दिले होते. पहिल्याच सामन्यात त्याने तुफानी खेळी करत दाखवून दिले आहे की, येणाऱ्या काही वर्षात त्याच्यावर कोट्यावधींची बोली लागू शकते.




