दिनेश आणि तारकेश्वरी राठोड या पुणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल दाम्पत्याने एवरेस्ट शिखर सर करून नवा विक्रम केला आहे. दोघांनी एकाचवेळी माउंट एवरेस्ट सर करण्याची ही देशातील पहिलीच घटना मानली जाते. त्यामुळे महाराष्ट्राची मान आपोआपच उंचावली आहे यात शंका नाही. दिनेश आणि तारकेश्वरी दोघेही २००६ मध्ये पोलीस दलात सामील झाले आणि सध्या शिवाजीनगरच्या मुख्यालयात कार्यरत आहेत.
२००८ साली दोघांचं लग्न झालं आणि तेव्हापासून एवरेस्टचं स्वप्न घेऊन दोघे काम करत होते. "एवरेस्ट सर होईपर्यंत अपत्य जन्माला घालायचं नाही असं दोघांनी ठरवून टाकलं होतं पण ते स्वप्न पूर्ण झाल्याने आम्हाला आता पालक व्हायला आवडेल", असे तारकेश्वरी राठोड एका मुलाखतीमध्ये म्हणाल्या. दोघांना साहसी काम करायला आवडतं. त्यांनी ऑस्ट्रेलियामधल्या सर्वोच्च शिखरावरही यशस्वी चढाई केली होती. त्याचबरोबर स्काय डायविंगसारखा खेळही दोघांच्या आवडीचा आहे.
काही दिवसांपूर्वी मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुहेल शर्मा यांनीसुद्धा एव्हरेस्ट शिखर सर केलं होतं. एवरेस्टवर जाणारे मेहकर हे पहिले आय.पी.एस. अधिकारी आहेत.
