दहावीचा निकाल लागला. काहींच्या चेहर्यांवर हसू होत तर काहींना पुन्हा परीक्षा देण्याचं टेन्शन. यात उत्तीर्ण झालेल्या मुलांना आनंद होणार हे तर स्वाभाविक आहे. पण हा आनंद झगडे कुटुंबासाठी काही औरच होता. वय म्हणजे फक्त काही आकडे असतात हेच सिद्ध केलंय वागेश्वरी नगर, शिवडीत राहणाऱ्या ४३ वर्षीय सरिता झगडे यांनी. चौथीत शिक्षण अर्धवट सोडलेल्या सरिताताईंनी यावर्षी आपल्या मुलीबरोबर दहावीची परीक्षा देण्याच ठरवलं आणि त्यात उत्तीर्ण देखील झाल्या. लहानपणीच वडील गेल्याने शिक्षण सोडून घर चालवण्याची वेळ सरिताताईंवर आली. पुढे शिक्षण सुटल ते कायमचंच.
सरिताताईंची मोठी मुलगी क्षितिजा याच वर्षी बारावी उत्तीर्ण झाली. १२ वीचा अभ्यास सांभाळून तिने आई आणि लहान बहिणीचा अभ्यास घेतला. त्याच बरोबर सरिताताईंचे पती विश्वनाथ झगडे हे देखील तितक्याच खंबीर पणे सरिताताईंच्या पाठीशी उभे राहिले. अभ्यासाची वेळ चुकू नये म्हणून त्यांनी घरातील कामे वाटून घेतली. सरिताताईंच्या या यशामागे हा त्यांच्या कुटुंबियांचा मोठा वाट आहे यात शंका नाही.
स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देणारी अशी माणसे प्रत्येक कुटुंबात असावीत हीच सदिच्छा.
