महाराष्ट्र राज्य हे नैसर्गिक विविधतेने नटलेले आहे. राज्यात जंगले आणि अभयारण्येही आहेत. राज्यात काही ठिकाणी संरक्षित राष्ट्रीय उद्यानेही आहेत. थोडीथोडकी नाही, राज्यातल्या विविध भागात एकूण ६ राष्ट्रीय उद्याने आहेत. या लेखमालेत आपण या राष्ट्रीय उद्यानांची विविधता उलगडून सांगणार आहोत. आजच्या पहिल्या लेखात आपण बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कबद्दल चर्चा करणार आहोत.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान लंग्स ऑफ सिटी म्हणून ओळखले जाते. यामागे कारण असे आहे की, मुंबईसारख्या प्रचंड प्रदूषण असलेल्या शहराला हे उद्यान मोठया प्रमाणावर ऑक्सिजन पुरवण्याचे काम करते. सुरुवातीला या उद्यानाचे क्षेत्रफळ खूपच कमी होते. या उद्यानाचा इतिहास खूप जुना आहे. आधी याचे नाव होते, कृष्णगिरी राष्ट्रवादी उद्यान. नंतर १९६० च्या दशकात याच्या आजूबाजूचे दुग्ध विकास मंडळाचे जंगल यात समाविष्ट करून एक नवे मोठे क्षेत्र निर्माण करण्यात आले. आज हे उद्यान १०४ वर्ग किमीच्या भल्यामोठ्या परिसरात पसरलेले दिसते. हे क्षेत्रफळ मुंबईच्या एकूण क्षेत्रफळाच्या तब्बल २० टक्के भाग व्यापून आहे. मुंबईअंतर्गत येणारे हे एकमेव संरक्षित वन आहे.


