तर्रीदार रस्सा असल्याशिवाय भाजी काही चवदार लागत नाही, असे किती जणांना वाटते? भारताच्या अन्नपदार्थाची ही खासियतच आहे. बऱ्याच लोकांना कुठलाही रस्सा असो, त्यावर तवंग आवडतोच. मसाला, मीठ आणि तेल हे शाकाहारी जेवण असो किंवा मांसाहारी असो सर्वात महत्वाचे घटक आहेत. काही भागांत तर फक्त तेलावर भाजी शिजते. पोटासाठी कमी आणि जिभेसाठी खाणारे खवय्येही तुम्हांला पावलोपावली भेटतील.
पण अर्थातच, जास्त तेल खाणे तब्येतीसाठी चांगले नाही. हळूहळू ट्रेंड बदलतोय. कमी तेलात भाजी कशी चवदार होईल याकडे आता कल वाढू लागला आहे. पण जर असा तेलाचा तवंग आलाच तर ते जास्तीचे तेल काढायचे कसे? त्यासाठी एक व्हायरल व्हिडीओ प्रचंड शेयर होतोय. एकदा नक्की बघून घ्या.
Using ice to remove the oil pic.twitter.com/EiIGv4vmUo
— Time For Knowledge (24×7) (@24hrknowledge) August 18, 2021
ही १८ सेकंदाची क्लिप आहे, यामध्ये ग्रेव्हीत जास्त तेल झाल्यास ते कसे काढावे याची एक भन्नाट आयडिया सांगितली आहे. तुम्ही व्हडिओ नीट पाहिल्यास दिसेल एका मोठ्या भांड्यातल्या ग्रेव्हीवर तेलाचा मोठा तवंग दिसतोय. ते तरंगते तेल काढायला एक अतिशय साधी युक्ती वापरली आहे. मोठ्या बर्फाच्या क्यूबच्या मदतीने ते तेल काढले जात आहे. बर्फाचा क्यूब ग्रेव्हीत बुडवला की त्याला तो तवंग चिकटतो. हा चिकटलेला तवंग काढून परत तेलात तो क्यूब बुडवून तेल काढले जात आहे. ही युक्ती किती मस्त आणि सोपी आहे, नाही का? यामागील विज्ञान असे आहे की बर्फामुळे तेलातील फॅट्स (चरबीचे) कण थंड होतात आणि ते चिकटतात. त्याचा थर बर्फाला चिकटल्यामुळे तो थर बाहेर काढता येतो.
ही भन्नाट आयडिया नेटकऱ्यांना इतकी आवडली की त्याला हजारो लाईक्स आणि शेयर मिळाले आहेत. त्यावर अनेक कमेंट्स आल्या आहेत. ग्रेव्ही किंवा करीपासून अतिरिक्त तेल काढण्याचा हा सोपा उपाय तुम्हाला माहीत होता काय? कमेंट करून नक्की सांगा.
लेखिका: शीतल दरंदळे
