शाळा बंद होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. अधूनमधून शाळा सुरू होतील अशा बातम्या येतात पण मुलांच्या शिक्षणाचे मात्र मोठे नुकसान होत आहे. ज्यांच्याकडे मोबाईल सारख्या सुविधा आहेत ते ऑनलाइन शिक्षण तरी घेत आहेत, मात्र ज्यांना मोबाईल आणि इंटरनेट परवडत नाही त्यांची ओढाताण होत आहे. अशा मुलांसाठी समाजातील काही कर्ते लोक अधूनमधून पुढे येत असतात.
शाळा बंद आहेत तरी मुलांना शिकता यावे यासाठी गावातल्या भिंतीवर अभ्यासाच्या गोष्टी लिहीणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांची गोष्ट आम्ही तुम्हाला सांगितली आहे. आज बसला शाळेत बदलणाऱ्या अवलियाची गोष्ट तुम्ही वाचणार आहात.
मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते अशोक कुर्मी यांनी गरीब मुलांसाठी बसचे रूपांतर शाळेत केले आहे. या बसचा सध्या कुठलाही वापर नसल्याने या संधीचा चांगल्या कामासाठी फायदा घेता येईल हा विचार त्यांनी केला. स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर त्यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.





