कल्पना करा तुमचा स्वतःचा व्यवसाय आहे. एक छोटी कंपनी आहे. तिथे काही कर्मचारी काम करत आहेत. धंदा तसा बरा चाललाय, पण तरी तुमच्या मनासारखा नाही. तुमचं उत्पादन आणि विक्रीचे आकडे वाढायला हवेत हे तुम्हाला जाणवतं. पण कुठेतरी माशी शिंकत आहे. तसे कर्मचारी वेळेवर येतात, कामही करतात. पण एकदा का सुटण्याची वेळ झाली की आवरायला घेतात आणि अगदी वेळेत निघतात. इकडे ठरवल्याप्रमाणे टारगेट पूर्ण न झाल्याची टोचणी तुम्हालाच लागते. अशावेळी तुम्ही काय कराल? या प्रश्नाचं सगळ्यात स्वाभाविक उत्तर म्हणजे कर्मचाऱ्यांना रोजचं टार्गेट ठरवून देऊन त्यांच्याकडून ते पूर्ण करून घेणं आणि प्रसंगी जास्त वेळ काम करण्याचीही त्यांची तयारी असायला हवी हे त्यांच्या मनावर बिंबवणं. ही गोष्ट अर्थातच अजिबात सोपी नाही. पण खऱ्या व्यावसायिकाचा कस अशाच वेळी लागतो. निलॉन्स नावाच्या अशाच एका कंपनीची ही गोष्ट.
कॉर्पोरेट कल्चर रुजवून छोट्या कंपनीपासून तीन लाख आउटलेट्स पर्यंत झेप घेणारी निलॉन्स कंपनी!! वाचा या भारतीय कंपनीच्या यशाची कहाणी..


१९६५ मध्ये उत्तर महाराष्ट्रात जन्मलेली ही कंपनी आज सातासमुद्रापार गेली आहे. पण हा पल्ला गाठण्यामागे जवळपास दोन पिढ्यांचे श्रम कारणीभूत ठरले आहेत.
निलॉन्सचे संस्थापक सुरेश संघवी यांचा जन्म शेतकरी कुटुंबातला. पण त्यांच्या मोठ्या भावाने त्यांना शेती व्यतिरिक्त इतर क्षेत्रातही प्रयोग करण्यासाठी, त्या क्षेत्रांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्याची परिणती म्हणून निलॉन्सची स्थापना झाली.
कंपनी सुरू झाल्यावर सुरुवातीला सुरेश संघवी यांनी मालाचं उत्पादन करण्यासाठी युनिट म्हणून स्वतःचंच स्वयंपाक घर वापरलं. डायनिंग टेबल म्हणजे प्रयोगशाळा बनली. या शाळेत ते प्रत्येक उत्पादित मालाची चव आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी तपासून घेत असत. सुरुवातीच्या काळात कंपनीने फळांच्या अर्कापासून जेली, जॅम, भाजलेल्या शेवया, लोणची, टुटीफ्रुटी यांचं उत्पादन करून ते विकलं. यावेळी त्यांच्याकडे दोन गाड्या होत्या. उत्पादित केलेला सर्व माल हा त्या गाड्यांमध्ये भरला जायचा आणि नंतर या गाड्या दोन विरुद्ध दिशांना निघून जात. त्यातील एका कारमध्ये स्वतः सुरेश, तर दुसऱ्या कारमध्ये त्यांना प्रोत्साहन देणारे त्यांचे मोठे बंधू असत. हा सगळा माल विकला गेल्यावरच या दोन्ही गाड्या परत येत असत.

२००४ ते २००८ या काळात निलॉन्सच्या टीमने बाजारपेठेतल्या जास्तीत जास्त वितरकांपर्यंत पोहोचण्याचा कसोशीने प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी b2b म्हणजे बिझनेस टू बिझनेस मॉडेल निवडलं. या प्रकारामध्ये प्रत्यक्ष उपभोक्त्या ग्राहकांऐवजी व्यापारी, छोटे मोठे दुकानदार, सुपरमार्केट यांसासारखे व्यवसायिक हेच कंपनीचे ग्राहक असतात.
२००८ नंतर निलॉन्सने रिटेलकडे मोहरा वळवला. याच काळात कंपनीने इक्विटीचा काही भाग विकून निधी उभारला. पूर्वी विकत असलेल्या जॅम, लोणची यांच्या जोडीला आलंलसूण पेस्ट, पेयं यांची भर पडली. आता कंपनी वितरक, किरकोळ विक्रेते यांच्याबरोबर काम करते. केवळ भारतातच नाही, तर युरोप, अमेरिका, मध्य पूर्वेकडील देशांतही त्यांची उत्पादनं विकली जातात.

आज ३५०० वितरक आणि ३ लाखाच्या आसपास आउटलेट्स असूनही दीपक समाधानी नाहीत. त्यांच्या मते भारतीय बाजारपेठेत प्रचंड मोठ्या प्रमाणावर संधी आहेत. त्यामुळे भारतीय बाजारपेठेत कंपनी अधिक रुजवण्याचा, तिचा विस्तार करण्याचा दीपक यांचा मानस आहे. पुढील पाच वर्षात कंपनीचं मूल्य पंधराशे कोटी रुपयांपर्यंत नेण्याचं दीपक यांचं उद्दिष्ट आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी कंपनीला दहा लाखांपेक्षा जास्त आऊटलेट्स काढण्याची आणि उत्तम प्रकारे ब्रँडिंग करण्याची गरज आहे. त्यासाठी पंकज त्रिपाठीसारख्या नामवंत कलाकाराची त्यांनी नियुक्ती केली आहे.
सध्याच्या काळात ऑनलाइन व्यवहार, डिजिटल ट्रान्झॅक्शन या गोष्टींना महत्त्व आलं आहे. ते लक्षात घेत कंपनी d2c म्हणजेच थेट वापरकर्त्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणून कंपनीने स्वतःची वेबसाईट निर्माण केली आहे. त्याचबरोबर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरदेखील कंपनी उत्पादनं उपलब्ध आहेत.
शेवटी काय, काळाची पावलं ओळखून त्याप्रमाणे आपल्या व्यवसायाची रणनीती आखणं महत्त्वाचं. निलॉन्स नेमकं हेच करत आहे.
स्मिता जोगळेकर