९ जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या नावांच्या जन्माच्या रंजक कथा!!

लिस्टिकल
९ जगप्रसिद्ध ब्रँड्सच्या नावांच्या जन्माच्या रंजक कथा!!

स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा म्हटल्यावर किती तरी सोपस्कार पूर्ण करावे लागतात. यातली पहिली गोष्ट म्हणजे आपल्या व्यवसायाचे नाव ठरवणे. आपल्या व्यवसायाला काय नाव द्यावे इथेच बऱ्याच जणांची गाडी अडकलेली असते. जगभरात नावाजलेल्या मोठमोठ्या ब्रँड्सनी त्यांची नावे कशी ठरवली असतील? त्यांना त्यांच्या कामामुळे प्रसिद्धी मिळाली असेल की नावामुळे? खरे तर व्यवसायाचे नाव ठरवणे हे वाटते तितकी अवघड गोष्ट नाहीये. म्हणूनच जगभरात प्रसिद्ध असलेल्या या ९ ब्रँड्सची नावे कधी ठरवण्यात आली याचे काही मजेदार किस्से आम्ही घेऊन आलो आहोत.

१) बार्बी –
तर या यादीतील पाहिलं नाव आहे, बार्बी. आता बार्बी म्हणजे काय हे काही आम्ही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण बार्बीच्या निर्मात्यांना हे नाव कसं सुचलं असेल? बार्बीची सर्वेसर्वा रुथ हँड्लर हिने आपली मुलगी बार्बरा मिलीसंट हिच्या नावावरून आपल्या या व्यवसायाचं नाव बार्बी ठेवलं. खरंतर मुलीला बाहुल्यांची असलेली आवड पाहूनच तिने हा बाहुल्या बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्याचा निर्णय घेतला होता म्हणून तिने मुलीच्याच नावाने आपल्या कंपनीची सुरुवात केली. आता ही बार्बी जगातील जवळपास प्रत्येक घरात पोहोचली आहे.

२) लकास्ट –
स्पोर्ट्सवेअर, आयवेअर, घड्याळे, परफ्यूम्स, चामड्याच्या वस्तू, टॉवेल अशा वस्तू तयार करणाऱ्या या कंपनीचे नाव त्याचा संस्थापक रेने लकास्ट याच्या नावावरूनच ठरवण्यात आले. लकास्ट फ्रान्समधील एक प्रसिद्ध फुटबॉलपट्टू आहे. एकदा त्याने मॅच खेळताना मगरीचे चित्र एम्ब्रॉइडर केलेला शर्ट घातला होता. त्याचा हा शर्ट आणि त्यावरील ती एम्ब्रॉइडरी केलेली मगर दोन्हीही त्याच्या चाहत्यांना खूपच आवडले. तेव्हापासून हिरव्या रंगातील मगर हाच लकास्टचा लोगो बनला.

३) आयकिया (IKEA) –
हे नाव जगप्रसिद्ध मोबाईल कंपनी नोकियाशी साधर्म्य साधणारे असले तरी दोघांचाही दुरान्वयेही संबंध नाही. आयकियाचे संस्थापक आहेत इंग्वार कोम्पार्ड. त्यांच्या नावातील (Ingvar Kompard) , त्यांच्या परिसराच्या नावातील (Elmtaryd) आणि त्यांच्या गावाच्या नावातील (Agunnaryd) पहिली अक्षरे घेऊन आयकिया (IKEA) हे नाव तयार करण्यात आले.

४) ॲस्टन मार्टिन –
लक्झरी आणि स्पोर्ट्स कार बनवणाऱ्या या कंपनीच्या नावाची ही एक स्वतंत्र कथा आहे. लिओनेल मार्टिन आणि रॉबर्ट बोम्फोर्ड या दोघांनी मिळून या कंपनीची सुरुवात केली. त्यांनीच बनवलेल्या एका कारच्या सहाय्याने लिओनेल मार्टिनने “एस्टन क्लिंटन हिल क्लाइंब” नावाची स्पर्धा जिंकली. या स्पर्धेच्या नावातील एस्टन आणि लिओनेल मार्टिन च्या नावातील मार्टिन एकत्र करून ‘ॲस्टन मार्टिन’ या नावाचा जन्म झाला.

५) लिप्टन –
हा ग्रीन टी तर आता घराघरात पोहोचला आहे. चहाचे व्यापारी असलेले थॉमस लिप्टन यांनी आपल्याच आडनावाने हा व्यवसाय सुरु केला होता.

६) जेन अँड बेरी –
जेन अँड बेरी ही एक प्रसिद्ध आईसक्रिम कंपनी आहे. हिची स्थापना १९७८ मध्ये झाली. बेन कोहेन आणि जेरी ग्रीनफिल्ड या दोन मित्रांनी एकत्र येऊन ही कंपनी सुरु केली. दोघांच्याही नावानेच ही कंपनी ओळखली जाते.

७) नायके एअर जॉर्डन –
मिशेल जॉर्डनला नायके कंपनीसोबत विशिष्ट प्रकारच्या बुटांची निर्मिती करण्याची इच्छा होती. विशेषत: त्याने बॅडमिंटनपटूंसाठी विशिष्ट प्रकारचे बूट डिझाईन केले होते. नायके आणि जॉर्डन दोघांच्या नावांना एकत्र करून या बुटाला नायके एअर जॉर्डन असे नाव पडले.

८) आदिदास –
आदिदासचे नाव कुणाला माहिती नाही. स्पोर्ट शूजसाठी ही कंपनी जगभरात ओळखली जाते. ॲडी डॅसलेर याने जमर्नीमध्ये ॲथलीट्सना उपयोगाचे होतील अशा वस्तूंचे उत्पादन सुरु केले. १९५४ साली जर्मनी आणि हंगरी यांच्या सामन्यात जर्मनीचा विजय झाला होता. विशेष बाब म्हणजे या सामन्यात जर्मनीच्या संघाने आदिदासच्याच वस्तूंचा वापर केला होता. ॲडी डॅसलेरच्याच नावावरून या कंपनीचे नाव आदिदास असे पडले.

९) मर्सिडीज –
एमिल जेलीनेक आणि कार्ल बेंझ यांनी जगप्रसिद्ध मर्सिडीज गाडीची निर्मिती केली. जेलीनेकची मुलगी मर्सिडीझ आणि कार्लचे आडनाव यावरून याचे नाव मर्सिडीझ-बेंझ असे पडले.

आता हे वाचल्यावर तुमच्या लक्षात आले असेलच की, या जगप्रसिद्ध व्यवसायांची नावे किती सोप्या पद्धतीने ठरवण्यात आली. तुम्ही तुमच्या व्यवसायाला स्वतःचे, आपल्या मुलांचे किंवा पत्नीचे नाव देऊन त्याला एक ब्रँड बनवू शकता. शेवटी शेक्सपिअर म्हणून गेला आहेच, “नावात काय ठेवलंय?”

मेघश्री श्रेष्ठी