बोरिंग प्रोग्रॅमिंग सोडा, 'बोल भाई', 'जबतक भाई','अगर भाई' अशा कीवर्ड्ससह 'भाई-लँग'मध्ये कोड लिहून पाहा..

बोरिंग प्रोग्रॅमिंग सोडा, 'बोल भाई', 'जबतक भाई','अगर भाई' अशा कीवर्ड्ससह 'भाई-लँग'मध्ये कोड लिहून पाहा..

एकच काम सतत करणं हे कंटाळवाणं वाटतं. तेही साहजिक असते म्हणा. पण हाच कंटाळा मात्र कधीकधी भन्नाट डोक्यालिटीला चालना देते. सध्या दोन सॉफ्टवेअर इंजिनिअर्सची ही कल्पक डोक्यालिटी इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

रिषभ त्रिपाठी या ग्रो आणि अनिकेत सिंग या ॲमेझॉनमध्ये काम करणाऱ्या दोन इंजिनियर्सने चक्क भाई- लँग म्हणून प्रोग्रामिंगमध्ये अफलातून अशी नवी लँग्वेज तयार केली आहे. टाइपस्क्रिप्टमध्ये लिहिलेली ही नवी लँग्वेज भारी आहे.

भाई-लँगमधला प्रोग्रॅम म्हणजे मुन्नाभाई आणि सर्किट जोडीतल्या संवादासारखा आहे. अर्थात हा खूप जवळच्या दोन मित्रांमधला संवादही होऊ शकतो. म्हणूनच ती 'भाई-लँग' आहे. प्रोग्रॅमची सुरवात 'हाय भाई' ने, तर शेवट 'बाय भाई'ने होतो. या कोडच्या आतील सर्व टॅग एक्झिक्युट होतात आणि अर्थातच बाहेरील सर्व इग्नोर केले जातात.

कोणत्याही प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये व्हेरिएबल्स डिक्लेअर केल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. भाई-लँगमध्ये यासाठी प्रोग्रॅमरला 'भाई ये है' वापरावे लागते, प्रिंट करण्यासाठी 'बोल भाई', लूपसाठी 'जबतक भाई' तर कंडिशन्ससाठी 'अगर भाई' असे भन्नाट की-वर्ड्स आहेत.

ए सगळं प्रकरण अर्थातच गिटहबवर उपलब्ध आहे. तिथे भाई लँग कशी बिल्ड करावी हे कंडिशन्स आणि लूप्ससहित समजविले आहे. तसेच ही भन्नाट लँग्वेज bhailang.js.org या वेबसाईटवर उपलब्ध आहे. वेबसाईटच्या प्लेग्राऊंड फिचरवर भाई लँग वापरून कमांड देता येईल. ही लँग्वेज तयार करणाऱ्या दोन्ही पठ्ठ्यांना गप्पा सुरू असताना ही आयडिया सुचली आणि त्यांनी लँग्वेज तयार सुद्धा केली आहे.

या थोड्या हटके लँग्वेज बद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हालाही कॉमेंटबॉक्समध्ये कळू द्या.

उदय पाटील