गुन्हेगारी जगतातील अनेक घटना सामान्य लोकांना हादरवून सोडण्यास पुरेशा असतात. अतिशय नृशंसपणे एखादं कृत्य करणारे लोक किती थंड रक्ताचे असतील हा विचार करूनही घाबरायला होते. काही माथेफिरू एकामागे एक असे खून करत असतात. सिरीयल किलर या नावाने ओळखले जाणारे हे लोक एकसारखे खून करत सुटतात आणि शेवटी कित्येक आयुष्य उध्वस्त केल्यावर त्यांना तुरुंगात डांबणे शक्य होते. आज ज्या सिरीयल किलरची कहाणी तुम्ही वाचणार आहात, तो जगातील सर्वाधिक जास्त खून करणाऱ्या सिरीयल किलरपैकी एक आहे.
दक्षिण अमेरिकेत कोलंबिया नावाचा देश आहे. तोच तो, कुख्यात ड्रग डीलर पाब्लो इस्किबार आणि नार्कोस मालिकावाला देश. मॉंस्टर ऑफ द एन्ड्स या नावाने कुख्यात असलेल्या कोलंबियाचा पेड्रो लेपोज हा फक्त मर्डरर नव्हता, तर तो रेपिस्टदेखील होता. त्याने फक्त ९ ते १२ या चिमुकल्या वयोगटांत असणाऱ्या कोलंबिया, परु(पेरु) आणि इक्वाडोरमधल्या मुलींचे खून केले होते. १९८० साली त्याला अटक झाली तेव्हा त्याच्यावर ११० खुनांचे आरोप होते. पण पकडला गेल्यावर त्याने स्वतः तब्बल ३५० खून केल्याचे कबूल केले. यावरून तो किती भयंकर क्रूरकर्मा असेल याचा अंदाज येऊ शकतो.
पेड्रो लेपोजची गोष्ट सुरू होते १९६९ सालापासून. तेव्हा त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. तुरुंगातून बाहेर आल्यावर त्याने त्याच्यावर बलात्कार करणाऱ्या ४ माणसांचा खून केला. सूड म्हणून केलेल्या या दोन खुनांनंतर तो थांबला नाही. त्याच्या तोंडाला आता रक्त लागले होते. गरीब घरांतील लहान मुलींना त्याने शिकार करणे सुरू केले. हे सिरीयल किलर कितीही माथेफिरू वाटत असले तरी आपल्या गुन्हे करताना ते अतिशय चपळाई दाखवत असतात.


