देशाभिमानी असणं हा तसा कौतुकाचा गुण. पण तोच गुण जर एखाद्या स्त्रीने दाखवला तो धर्मद्रोह ठरेल का? आताच्या काळात या प्रश्नाचं उत्तर नाही असंच येईल, पण १५ व्या शतकात फ्रान्सला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्याचा चंग बांधलेल्या जोन ऑफ आर्कला मात्र आपल्या देशप्रेमाच्या गुणासाठी शिक्षा भोगावी लागली होती. ज्या फ्रान्सच्या जनतेत तिने स्वातंत्र्याची आणि देशासाठी प्राण त्याग करण्याची ऊर्मी चेतवली, त्याच जनतेच्या साक्षीने जोनला जिवंत जाळण्यात आले.
देशासाठी मरण पत्करण्यास सज्ज असलेल्या जोन ला याबद्दल अजिबात खेद नव्हता. पण ज्यांनी तिला धर्मद्रोही आणि राजद्रोही ठरवले त्यांनीच तिच्या मृत्युनंतर काही वर्षांनी संतपद बहाल केले. फ्रान्सच्या या लढवय्या, तरीही दुर्दैवी ठरलेल्या स्त्री योद्ध्याची कथा आजच्या लेखातून देत आहोत.
जोन ऑफ आर्क ही एक सध्या शेतकरी कुटुंबात जन्मलेली एक सर्वसाधारण मुलगी होती. तीचा जन्म १४१२ सालचा. एका सध्या कुटुंबात जन्मलेली आर्क फ्रान्सच्या स्वातंत्र्याची प्रेरणा कशी बनली? या प्रश्नाचे उत्तर खूपच रोचक आणि काहीसे गूढ आहे. आर्कचे बालपण युद्धाच्या धामधुमीतच गेले. त्यामुळे कदाचित स्वातंत्र्याच्या विचारांनी तिच्या बालमनाचा ताबा घेतला असावा, याचमुळे ती स्वतःला मला फ्रान्सला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठीच इथे पाठवलं असल्याचं सांगायची. वयाच्या तेराव्या चोदाव्या वर्षी तिला संतांचे आणि देवदूतांचे संदेश ऐकू येत असल्याचा तिने दावा केला होता. या देवदूतांच्या संदेशानुसार तिचा जन्म फ्रान्सच्या मुक्तीसाठी झाला आहे असे तिचे म्हणणे होते. आपल्याला सेंट कॅथरीन, सेंट मार्गारेट, आणि अर्चेंजल मिशेल आणि गॅब्रिएलचा आवाज ऐकू येतो. ते माझ्याशी बोलतात आणि फ्रान्सचा राजा चार्ल्स दुसरा याला मी इंग्रजांविरुद्धात लढण्यासाठी मदत केली पाहिजे असे ती म्हणत असे.


