श्रावण अमावस्येला म्हणजेच पिठोरी अमावस्येला साजरा करण्यात येणारा पोळा कींवा बैलपोळा हा सण ग्रामीण भागातील शेतकरी वर्ग पुर्वी मोठ्या उत्साहाने साजरा करायचा. हा दिवस विशेषतः शेतकऱ्यांच्या जिवाभावाच्या सोबती असलेल्या बैलांसाठी अतिशय खास असतो.
श्रावणाच्या शेवटी कमी झालेला पाऊस, श्रावणातले संपत आलेले सण, चोहीकडे सळसळणारी हिरवाई, आणि गावात साजरा होणारा तो बैलपोळा.. आजही ते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहीलं की मनाला आठवणींचा वेगळाच साज चढतो. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक असणाऱ्या या बैलांना कृतज्ञतेच्या भावनेतून या दिवशी पुजलं जातं, त्यांना आराम दिला जातो, आधी गावागावात बैलांना सजवून त्यांच्या मिरवणुका काढल्या जायच्या, कुठे बैलांच्या स्पर्धा तर कुठे मोठ्या यात्रा भरायच्या.. घराघरात पुरणपोळीचा बेत असायचा, लहानमोठे एकत्र येऊन हा बैलांचा उत्सव कीतीतरी छान एन्जॉय करायचे.
१०-१५ वर्षांपुर्वी हे चित्र गावागावात हमखास दिसायचं. तुम्हीही ते अनुभवलं असेल. पण आजकाल हा उत्सव पुर्वीसारखा पहायला मिळत नाही. कारणही तेच आहे.. शेतकर्यांनी परंपरागत पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञानाची धरलेली कास..!!
पुर्वी शेतीच्या मशागतीसाठी घरोघरी बैलजोडी पाळली जायची. पण आज शेतीसाठी अनेक आधुनिक अवजारे आणि यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यामुळे ही बैलजोडी आता घरातुन दिसेनाशी झालीय. पुर्वी कुटूंबाचाच एक भाग असलेले हे सर्जा-राजा आता चुकूनच कोणाच्यातरी घरी दिसतात. आज बैलपोळाही पुर्वीसारखा साजरा होत नाही. घरोघरी मातीचे बैल पुजले जातात. काळाबरोबर धावता धावता मानव इतका व्यस्त झालाय की आज त्याला आपले उत्सव, सण साजरे करायला वेळही नाही, आणि नाही त्याबद्दल त्याला काही खेद वाटतो.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण हेतु जोपासला जातो. प्राणीमात्रांवर प्रेम करायला शिकवणारा हा बैलपोळा आता जास्त कुठे साजरा होत नाही. आणि झाला तरी त्यात आधीसारखा उत्साह, भव्यता नाही. एकंदरीत आपल्या आठवणींमध्ये असणारा बैलपोळा आणि आज कुठेतरीच साजरा होणारा बैलपोळा... यातला फरक तुमच्या मनाला नक्कीच हुरहुर लावून जाईल...
