ड्रायव्हर म्हणलं की तुमच्या डोळ्यासमोर कोण येतं सांगा बरं? अर्थात कोणी पुरुषच. साधं कोपऱ्यावर जायचं असेल तर पुरुषमाणूस गाडी चालवणार, लांबचा प्रवास असेल तर कार चालवणाराही घरातला पुरुषच असतो. बायकांना आवड असेल तर 'कमी गर्दी असेल तिथे चालव' असं सहज सांगितलं जातं.
अवजड ट्रक किंवा बस यांचे ड्रायव्हर कोणी स्त्री असेल याचा कोणी विचारही केला नसेल. हो ना? पण कठुआ बसोहली जिल्यातील सांधर गावच्या पूजादेवी यांनी हा समज दूर केलाय. पुजादेवी ह्या जम्मू काश्मीर पहिल्या महिला बसचालक ठरल्या आहेत. त्यांनी २४ डिसेंबरला कठुआ ते जम्मू हा ८५ किलोमीटरचा प्रवास बस चालवून यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. हा रस्ता पहाडी वळणाचा असून प्रवासी भरलेली बस चालवत घेऊन जाणे हे जबाबदारीचे काम आहे. पुजादेवींनी हे सिद्ध केलं की या क्षेत्रातही स्त्रिया स्वतःला सिद्ध करू शकतात.



