पूर्वी पितळेचे फिरकी तांबे घेऊन लोक प्रवास करत असत. त्यानंतर काचेच्या बाटल्या आल्या. प्लॅस्टिकचा वापर सर्रास सुरु झाल्यावर वॉटरबॅग -वॉटर बॉटलचे दिवस आले. प्रवासात पाणी पिण्याची सोय झाली खरी, पण ते पाणी स्वच्छ-अस्वच्छ शुध्द -अशुध्द जसे मिळेल तसेच प्यावे लागायचे. परिणामी प्रवासाच्या दरम्यान आजारी पडण्याचे प्रमाण बरेच होते. गेल्या काही वर्षात 'पॅकेज्ड ड्रिकींग वॉटर' म्हणजे आपल्या रोजच्या भाषेत 'बिसलेरी' आली आणि शुध्द स्वच्छ आरोग्यदायक पाणी मिळण्याची सोय झाली. ही सोय झाली खरी, पण एका लिटरमागे कमीतकमी २० रुपये मोजावे लागतात, ते पाणी खरेच मिनरल वॉटर आहे का याची खात्री नसते आणि सोबत प्लास्टिकचा कचरा वाढत जातो ही बाब पण महत्वाची आहे.
अमेरिकेत राहणार्या एका भारतीय तरुणाने-राजेश गुडुरु- या संशोधकाने यावर नामी उपाय शोधून काढला आहे. त्याच्या उपक्रमाचे नाव आहे 'क्रेझी कॅप'!! कॅप म्हणजे बाटलीचे झाकण. या झाकणातून बाटलीत भरलेल्या पाण्यात अल्ट्रा-व्हायोलेट किरणांचा झोत सोडला जातो आणि काही क्षणांत पाण्यात मिसळलेल्या बॅक्टेरिया आणि व्हायरसेसचा खातमा केला जातो. क्रेझी कॅपची आणखी माहिती घेण्यापूर्वी राजेश गुडुरु यांच्याबद्दल थोडी माहिती वाचू या.














