लाईफ ऑफ पाय तुम्ही पाह्यला असेल. जहाज फुटून तराफ्यावर जीव जगवत असलेले 'पाय' पटेल आणि पीटर पार्कर तर आठवत असतीलच. खाणं, पिण्याचं पाणी मिळवणं, सागरी जीवांपासून संरक्षण करणं आणि हे सगळं करत असताना आपणही जगणं.. सिनेमातल्या कल्पना व्हीएफएक्सचय माध्यमातून छान वाटतात. पण असंच काही कुणी खरंच अनुभवलं असेल तर? ते ही थोडेथोडके नाही, १३३ दिवस एकाकी, समुद्रात कंठले असतील तर? तर, आजची गोष्ट आहे दुसऱ्या महायुध्दाच्या दरम्यान अशा संकटात सापडलेल्या एका माणसाची. इतके दिवस एकाकी समुद्रात राहण्याचं त्याच्यानावे रेकॉर्डही आहे. वाचा मग त्याची गोष्ट!!
काळ होता दुसऱ्या महायुद्धाचा! जमीन, आकाश, समुद्र, सगळीकडेच युद्धाचे सावट पसरले होते. शत्रूराष्ट्राचं सैनिक दिसो, विमान की, जहाज त्यावर हल्ला करायचाच, एवढंच युद्धाचं सूत्र! अशातच केप टाऊनहून सुरीनामसाठी एक ब्रिटिश जहाज चालले होते. अमेझॉनच्या पूर्वेकडून जाताना जर्मन जहाजाने लक्ष्य या ब्रिटिश जहाजावर पडले आणि त्यांनी लागलीच या जहाजाला छेदण्यासाठी टर्पोइडच्या सहाय्याने हल्ला केला आणि त्याचे दोन तुकडे करून टाकले. जहाजावर एकूण ५३ लोक होते आणि यातील फक्त एकच माणूस वाचला, ज्याचे नाव होते पूँ ली.





