कोण होते मेजर जनरल इयान कार्डोझो? अक्षय कुमारचा गोरखा त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे

लिस्टिकल
कोण होते मेजर जनरल इयान कार्डोझो? अक्षय कुमारचा गोरखा त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे

अक्षय कुमारचा नवा सिनेमा गोरखाचे पोस्टर पाह्यले का? ते रिलीज झाल्यापासून चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्याचा पोस्टरवरचा अवतार पाहून हा नक्कीच कोणत्यातरी शूर सैनिकावर बेतलेला चित्रपट आहे हे लक्षात येते. यासिनेमा बेतला आहे मेजर जनरल इयान कार्डोझोच्या. आता हे कोण असा प्रश्न तर पडला असेलच, तर बोभाटा उत्तरासह सज्ज आहे.

या सिनेमात अक्षय कुमार अर्थातच मेजर जनरल इयान कार्डोझोंची भूमिका साकारणार आहे. ते आता ८४ वर्षांचे आहेत. त्यांनी १९७१ च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी प्रसंगी स्वतःचा पाय कापला आणि पराक्रमाची शर्थ केली. त्यांच्या आणि अशाच शूर सैनिकांमुळे पुधे चालून पूर्व-पाकिस्तान स्वतंत्र झाला आणि बांगलादेशची निर्मिती झाली. त्यांची अंगावर शहारा आणणारी प्रेरणादायी कथा या चित्रपटातून प्रेक्षकांना समजणार आहे.
युद्धादरम्यान स्वत:च आपला पाय कापणारे मेजर इयान कार्डोझो. त्यांच्यावर आधारित गोरखाचा ट्रेलर पाह्यलात का?

१९७१ मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत होता. युद्ध सुरू झाले तेव्हा कार्डोझो डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज, वेलिंग्टन येथे एका कोर्सला जात होते . त्यावेळी त्यांच्या बटालियनचे म्हणजेच 4/5 गोरखा रायफल्सचे सेकंड-इन-कमांड मारले गेल्यानंतर, कार्डोझो यांनी त्याची जागा घेतली. अशाप्रकारे ते भारतीय सैन्याच्या पहिल्या हेलिबोर्न ऑपरेशनचा भाग बनले. गंमत म्हणजे त्यांच्या गोरखा रेजिमेंटला त्यांचे नाव उच्चारणे अवघड वाटत असल्याने ते मेजर जनरल इयान कार्डोझोला 'कार्टूज साहिब' म्हणत. हिंदीमध्ये कार्टूज म्हणजे काडतूस.

भारत-पाक युद्धाच्या शेवटच्या दिवसांमध्ये ढाका पडले. पण कार्डोझोंचे भूसुरुंगावर पाऊल पडले आणि ते जखमी झाले. त्यांना शिबिरात लगेच नेले, पण तेथे उपचार करू शकणारे डॉक्टर नव्हते. सगळ्यांना वाटले ते आता जगणार नाहीत. पण थोड्या वेळाने ते शुद्धीवर आले. तेव्हा त्यांच्या सहकाऱ्यांना हायसे वाटले,पण त्यांची प्रकृती अजूनही चिंताजनक होती.

त्यावेळी त्यांनी मॉर्फिन म्हणजे गुंगीचे औषध मागितले. त्याक्षणी मॉर्फिन तेथे उपलब्ध नव्हते. त्यानंतर कार्डोझोंनी स्वतः पाय कापण्याचा निर्णय घेतला. आपल्या साथीदारांना त्यासाठी मदत करण्यास सांगितले, परंतु योग्य वैद्यकीय उपकरणाशिवाय कोणीही तसे करण्यास नकार दिला. पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम होते. त्यावेळी झालेला संवाद त्यांच्याच शब्दात वाचा.

"'माझी कुकरी कुठे आहे?" मी माझ्या गोरखा फलंदाजाला, बालबहादूरला विचारले. त्याने ती बाहेर काढल्यावर मी म्हणालो, "माझा पाय कापून टाका." त्याने नकार दिला.म्हणून मी तो पाय कापला आणि तो दफन करण्यास सांगितले." त्यांना कुकरी म्हणजे एक धारदार शस्त्र दिल्यावरही सगळे नाखूष होते. एका क्षणाचाही विचार न करता कार्डोझोंनी स्वतःच्या हातानेच स्वतःचा पाय कापला.

नुसता विचार करूनच हा प्रसंग किती भयानक होता हे लक्षात येईल. इतका मोठा निर्णय क्षणात घेऊन आपला पाय कापून त्यांनी बाजूला केला. काही दिवसांनंतर भारताने युद्ध जिंकले. त्यांच्या शौर्याची कहाणी जेव्हा संपूर्ण देशाला समजली तेव्हा सर्व अवाक झाले. त्यांनी सिद्ध केले की देशासाठी एक सैनिक काहीही करू शकतो. त्यानंतर त्यांना सेना पदकाने सन्मानित करण्यात आले.

कहाणी इथेच संपत नाही मंडळी. सर्जरी केल्यानंतर इयान यांनी शरिराला एक लाकडी पाय बसवून घेतला. पण विकलांग असल्यामुळे सैन्याने त्यांना बढती द्यायला नकार दिला. या लाकडी पायासोबतही अनेक कठीण कामं ते लीलया करायचे. मेजर इयान यांच्या सामर्थ्याची परिक्षा तत्कालीन सेनाप्रमुख, जनरल टि. एन. रैना यांनीही घेतली. लडाख मधल्या धोकादायक बर्फाच्छादित टेकड्यांवर त्यांना चालवलं गेलं, आणि यातही ते उत्तीर्ण झाले! त्यानंतर त्यांना सेनेकडून बढती मिळाली. भारतीय सेनेचे ते पहिले असे अधिकारी आहेत, ज्यांनी विकलांग असुनही मेजर जनरल पद मिळवलं.

इयान कार्डोझोंचा जीवनप्रवास पाहायचा तर त्यांचा जन्म १९३७ मध्ये मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव व्हिन्सेंट कार्डोझो आणि आईचे नाव डायना डिसोझा- कार्डोझो असे होते. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स हायस्कूल, फोर्ट आणि सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय संरक्षण अकादमीमध्ये (NDA) प्रवेश घेतला. तिथूनच त्यांच्या लष्कराच्या प्रवासाची सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यांनी गोरखा रायफलमध्ये सामील होण्यापूर्वी इंडियन मिलिटरी अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतले. विशेष म्हणजे सुवर्ण आणि रौप्य दोन्ही मिळवणारा ते पहिले NDA कॅडेट आहे. ॲकॅडमीत सर्वोत्कृष्ट अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कॅडेटला सुवर्णपदक दिले जाते.

नुकतीच शेरशाह या चित्रपटात देशासाठी प्राण देणाऱ्या शूर सैनिकाची कथा प्रेक्षकांना खूप भावली होती. आता गोरखा हा चित्रपट आल्यावर प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरेल.

शीतल दरंदळे