काही वर्षांपूर्वी दादर स्थानकावर एक धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. त्यावेळी दादरचा फुट ओवर ब्रिज अत्यंत अरुंद होता. सकाळी किंवा संध्याकाळी दोन गाड्या एकाच वेळी आल्या की दाट गर्दी व्हायची. एका कल्पक, परंतु उपद्रवी महाभागाने या गर्दीतून रस्ता ताबडतोब मिळावा, यासाठी मोटर कारच्या हॉर्नचे आवाज काढणारे एक खेळणे सोबत आणले होते. त्यातून हॉर्नचा पीपीप आवाज आला की समोरचा माणूस आपण आता रस्त्यावर नाही हे विसरून केवळ प्रतिक्षिप्त क्रियेने बा़जूला उडी मारायचा. हॉर्नचा आवाज आणि जीव वाचवण्याची प्रतिक्षिप्त क्रिया मेंदूत इतकी एकजीव झालेली असते की आपण रेल्वे पुलावर आहोत, रस्त्यावर नाही, याचे भान पण हरवून जायचे. परिणामी धक्काबुक्कीला सुरुवात व्हायची. रेल्वे पोलिसांच्या वेळीच केलेल्या हस्तक्षेपाने हे प्रकार व्हायचे थांबले. वाहत जाणार्या गर्दीसमोर अनपेक्षित काही घडले की त्याचे रूपांतर धक्काबुक्कीत आणि नंतर चेंगराचेंगरीत होते, हे समजण्यासाठी हे उदाहरण पुरेसे ठरावे.
आता या प्रकारचे शास्त्रीय स्वरूप बघू या. जमावाचे गर्दीत रूपांतर झाले की Crowd Density वाढत जाते. तज्ज्ञांच्या मते "When a minimum of eight people are pressed together and have less than 1. 5 ft. per person, the crowd has reached a critical density level. At this point there is no space between people. In this situation, shock waves; which cause individuals to move involuntarily, can be seen moving through crowds." ही पातळी ओलांडल्यावर गर्दीच्या लाटा तयार होतात. लाटांमध्ये व्यक्तीला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही आणि एकाच वेळी अनेक लाटा तयार होतात. सुरुवातीला या लाटा पुढे मागे होत (नैसर्गिकरीत्या) बलाबल जोखत राहतात (नैसर्गिक तोल सांभाळण्याची क्रिया) आणि निर्णायक बळ मिळाले की एकाच दिशेने परंतु अनपेक्षित वेगाने लाटा पुढे फेकल्या जातात. दबावाचे प्रमाण इतके वाढते की तयार झालेली लाट फुटते. एक लाट फुटली की त्यावर आदळणार्या दुसर्या लाटेने Crowd Density आणखी वाढते. लोक जागचे उचलले जाऊन पुढे फेकले जातात. अंगावरचे कपडे मागे खेचले जाऊन शरीर पुढे ढकलले जाण्याची प्रक्रिया सुरू होते. पायदळी तुडवले जाण्याची क्रिया सुरू होते. जर गर्दीची ऊर्जा अतिशय उच्च पातळीवर असेल तर दबाव (compression) ग्लासगो किंवा सिनसिनाटी या शहरात जे चेंगराचेंगरीचे प्रकार घडले, त्यात लोखंडी कठडेसुद्धा गर्दीच्या दबावाने (compression) वेडेवाकडे झालेले आढळले आहेत. जमिनीपासून रोवलेला दोन इंच व्यासाचा, स्टीलचा कठडा वाकण्यासाठी एक हजार पाउंडाचे प्रेशर लागते. जे गर्दीच्या दबावाने तयार झाले होते.
गर्दीत पायदळी तुडवले जाऊन मृत्यू येणार्यांच्या संख्येपेक्षा गुदमरून मरणारांची संख्या जास्त असते. याचे कारण म्हणजे दबाव (compression).गर्दीचे मानसशास्त्र अभ्यास करणार्या निरीक्षकांनी चेंगराचेंगरीच्या प्रकाराचे दोन वेगवेगळ्या वर्गात विभाजन केले आहे.