कधी कुणाचे नशीब उचल खाईल सांगता येत नाही. कधी कुठे चुकून कुणाचा तरी एक फोटो, व्हिडिओ निघतो तो काही तासांत देशभर पसरतो आणि ती व्यक्ती प्रसिद्ध होते. मग ती प्रसिद्धी सुप्रसिद्धी असते की कुप्रसिद्धी हा भाग वेगळा!! सोशल मीडियावर वायरल झाल्यामुळे रात्रीत नाव मिळालेल्या लोकांची यादी दिवसेंदिवस मोठी होत आहे. तुम्हांला अशाच एका रात्रीत प्रसिद्ध झालेल्या चहावाल्याची गोष्ट तर आठवत असेलच. फक्त तेव्हा असं रातोरात प्रसिद्ध होणं इतकं 'न्यू नॉर्मल' झालं नव्हतं.
पाकिस्तानात एका चहाची टपरी चालवणारा अर्षद खान!! तो आपल्या टपरीवर चहा बनवून उदरनिर्वाह चालवणारा हा तरुण. आज तो जिथे पोहोचला आहे, त्या ठिकाणी आपण पोहोचू असा विचार त्याने स्वप्नात देखील केला नसेल. २०१६ साली टपरीवर चहा बनवताना त्याचा एक फोटो जिया अली नावाच्या एका फोटोग्राफरने काढला आणि इंटरनेटवर टाकून दिला.




