कष्ट करून कमाई करण्याचं वय मर्यादित असतं हे कधीकाळी जाणवल्यानंतर माणसाने बचत करायची सुरुवात केली. या बचतीची सुरुवात नातीगोती सांभाळण्यापासून सुरु झाली असावी. पण त्यालाही मर्यादा असतात हे लक्षात आल्यावर स्वतःच्या मालकीची, म्हणजे स्व-केंद्रित बचत करण्यापर्यंत मजल माणसांनी गाठली. सुरुवातीला धान्याची, पाळीव प्राण्यांची, जमिनीची बचत सुरु झाली. पण केलेली बचत वाहत्या काळात वाहून जाऊ नये म्हणून किंवा ऐनवेळी मध्यरात्री हाताशी असावी म्हणून सोने-चांदी या स्वरुपात बचत सुरु झाली. त्यानंतर बचतीचे शास्त्र निर्माण झाले आणि त्यातून प्रत्येक बचतीच्या प्रकाराला 'अॅसेट क्लास' असे नाव देण्यात आले. अगदी सहज वापरले जाणारे अॅसेट क्लासचे प्रकार म्हणजे - बँकेतल्या ठेवी, कंपन्यांचे समभाग म्हणजेच शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने-चांदी, एकापेक्षा अधिक घरे वगैरे वगैरे.
आता काळ जसा बदलत जातो आहे त्यानुसार काही नवे 'अॅसेट क्लास' जन्माला आले आहेत. आज आम्ही त्यापैकीच एका नव्या अॅसेट क्लासची ओळख करून देणार आहोत. या क्लासला REIT म्हटले जाते. हा बचतीचा प्रकार बराच नवा आहे. अजूनही 'पॉप्युलर अॅसेट क्लास' मध्ये त्याची गणना होत नाही. साहजिकच लोकांना REIT फारशी परिचयाची नाही. चला तर 'बोभाटा'च्या आजच्या लेखात समजून घेऊ या REIT आणि त्याचे गणित!!














