मिलिंद बोकील यांची 'शाळा' वाचली असेल किंवा चित्रपट बघितला असेल त्यांना 'केवडा' आठवत असेलच. केवड्याला केवडा म्हणण्यापेक्षा 'केतकी' हे नाव जास्त शोभून दिसतं आणि केतकी म्हटलं की आठवतं ते हे गीत,
केतकीच्या बनी तिथे, नाचला ग मोर
गहिवरला मेघ नभी सोडला ग धीर
ही झाले फुलांवरच्या गाण्याबद्दल पण कविंना कवितेसाठी कोणतेच फुल वर्ज्य नसते.
जास्वंदाच्या लाल भडक फुलाला देव्हार्यापलीकडे एखाद्या गाण्यात किंवा कवितेत जागा मिळणे कठीण आहे असं तुम्हाला वाटतं असेल तर बा.भ.बोरकर यांची ही कविता वाचा .
जास्वंदीच्या पाच फुलातून
मरण एकदा मला म्हणाले
पहा कसे मी या झाडातून
भरले कोमल रसार्द्र पेले
येशुच्या मज स्मरल्या जखमा....
लिलीची फुले ही पु.शि. रेग्यांची कविता वाचा . फारच इमोशनल टाइप असाल तर डोळ्यात पाणी येईल
लिलीची फुले तिने
एकदा चुंबिता, डोळां
पाणी मी पाहिले....!
लिलीची फुले आता
कधीही पाहता, डोळां
पाणी हे साकळे....!
ज्या सदाफुलीला हिंदी भाषेत ' बेशरम' म्हणून हिणवले जाते त्या सदाफुलीला पण या कवितेत स्थान मिळाले आहे. कवि वसंत बापट यांची कविता वाचा आणि ऐकाही.
अजून त्या झुडुपांच्या मागे
सदाफुली दोघांना हसते
अजून आपल्या आठवणींना
शेवंती लाजवती होते
तसे पाहाया तुला मला ग
अजून दवबिंदू थरथरतो
अर्ध्यामुर्ध्या कानगुजास्तव
अजून ताठर चंपक झुरतो
अजून गुंगीमध्ये मोगरा
त्या तसल्या केसांच्या बासे
अजून त्या पत्यात लव्हाळी
होताच असते आपुले हासे
अजून फिक्कट चंद्राखाली
माझी आशा तरळत आहे
गीतांमध्ये गरळ झोकूनि
अजून वारा बरळत आहे
या सगळ्या फुलांना कुठे ना कुठेतरी जागा मिळाली आहे पण बिचार्या झेंडूला कोणत्याच गीतात -पद्यात जागा मिळाली नव्हती. ती उणिव भरून काढली आहे आचार्य अत्रे यांनी ! केशवकुमार या टोपण नावाने त्यांनी झेंडूची फुले हा काव्यसंग्रह लिहिला. त्या संग्रहाच्या अर्पण पत्रिकेत ते म्हणतात.