कार्तिकी भटनागर या पुण्यातील 17 वर्षाच्या मुलीला जेव्हा शरीरावर पांढरे चट्टे यायला लागले तेव्हा बऱ्याच अवहेलना झेलाव्या लागल्या, काही जणांनी तर तिला स्पर्श करण्यास पण नकार दिला. पण आज कार्तिकी आपल्या स्किन आर्टद्वारे एक पॉझिटिव्ह मेसेज देत आहे.
आपल्या त्वचेचा रंग हा मेलॅनिनच्या स्तरावर अवलंबून असतो. पण अशा केसेसमध्ये शरीरातल्या मेलॅनिन बनविणाऱ्या पेशी बंद पडतात. कार्तिकीच्या शरीरावर कोडाची सुरवात वयाच्या ७ व्या वर्षी झाली आणि चेहरा, हात, पाय आणि शरीराच्या इतर भागावरही पांढरे चट्टे यायला लागले.
असंच एकदा गप्पा मारत असताना तिचा एक मित्र कार्तिकीला म्हणाला की तुझ्या हातावरच्या एक चट्टा हा सफरचंदाच्या आकाराचा आहे. तेव्हा तीनं त्याचं म्हणणं हसण्यावारी नेलं पण घरी येऊन नीट पाहिले असता तिलाही तसंच जाणवलं. त्यांनतर तिने आपल्या शरीरावरील पांढऱ्या भागाला आऊटलाईन करून विविध रंगांनी रंगवायला सुरवात केली.

स्रोत
कार्तिकी म्हणते की तुम्ही कसेही असलात तरी तुमचं स्वतःवर प्रेम असले पाहिजे, त्यातूनच पुढे ती बॉडी पॉझिटीव्हिटीचा मेसेज देते. त्यासाठी तिने गेल्या दोन वर्षांपासून एक ब्लॉग चालवला आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून ती फक्त तिला चिडवणाऱ्या लोकांना उत्तर न देता अनेक लोकांना प्रभावी संदेश देत आहे.



