जगातल्या अगदी सर्वच प्राण्यांमध्ये युद्धाची खुमखुमी पाहायला मिळते. त्यातही मानवी युद्धांमुळे तर हवामान, भूगोल, इतिहास सगळ्याच गोष्टींवर परिणाम होतो. युद्धाच्या परिणामांची सावली भविष्यकाळावरही रेंगाळत राहते. इतिहासातील अनेक युद्धातून संहाराशिवाय काहीही निष्पन्न होत नाही हे एव्हाना लक्षात आले असले, तरी कधीकधी युद्ध ही एक अटळ घटना होऊन बसते. तर अशाच अनेक युद्धांपैकी आज आम्ही जगातील सर्वात छोट्या युद्धाची गोष्ट सांगणार आहोत. अवघ्या ३८ मिनिटांत हे युद्ध संपुष्टात आले होते, म्हणून याला जगातले सर्वात छोटे युद्ध म्हटले जाते.
१८९६ साली लढण्यात आलेले हे युद्ध अँग्लो-झांझिबार युद्ध म्हणूनही ओळखले जाते. या युद्धाची बीजे १८९०च्या हेलिगोलँड-झांझिबार करारामध्ये लपली होती. या करारानुसार झांझिबारचा ताबा ब्रिटिश सत्तेकडे सुपूर्द करण्यात आला होता, तर टांझानियावर जर्मनीचा अधिकार प्रस्थापित झाला होता. नकाशावर पाह्यलंत तर टांझानिया आणि झांझिबार हे आफ्रिका खंडातले एकमेकांचे शेजारी प्रदेश आहेत. सध्या झांझिबार हे टांझानिया देशाचा भाग आहे. तर या हेलिगोलँड-झांझिबार कराराच्या अनुषंगाने ब्रिटनने झांझिबार हा त्यांचाच संरक्षित भूभाग असल्याचे जाहीर केले. झांझिबारचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी स्थानिक सुलतान निवडला असला तरी तो त्यांच्या हातचे बाहुले बनून राहील याची त्यांनी व्यवस्थित काळजी घेतली होती. १८९३ साली हमाद बिन थुवैन हे झांझिबारचे ब्रिटिश पुरस्कृत अध्यक्ष बनले.



