माउंट एव्हरेस्टवर या जगातील सर्वात उंच पर्वत शिखरावर आपणही झेंडा रोवावा अशी अनेकांची इच्छा असते. यात काहीजण यशस्वी होतात, तर काहीजण अयशस्वी होतात. काहीजण अगदी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचूनही अपयशी ठरतात. यशस्वी झालेल्या गिर्यारोहकांना नंतर संपूर्ण जग ओळखू लागते, पण जे यशस्वी झाले नाहीत त्यांचे काय? जी वाहवा यशस्वी व्यक्तींना मिळते ती शेवटपर्यंत प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना मिळत नाही, त्यांच्या वाट्याला नेहमीच उपेक्षा येते. ही उपेक्षा किती विदारक असू शकते ते आजची ही कथा वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल.
माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे अनेक मार्ग आहेत, त्यापैकी एक मार्ग आहे उत्तरी मार्ग. या मार्गावर एव्हरेस्ट शिखरापासून जवळच एक मृतदेह गेले वीस वर्षे तिथेच पडून आहे. हा मृतदेह इंडो-तिबेटी पोलीस दलातील एका २८ वर्षीय तरुणाचा असल्याचे म्हंटले जाते. एव्हरेस्ट सर करून परतत असताना अचानक बिघडलेल्या हवामानामुळे १० मे १९९६ रोजी या इंडो-तिबेटीयन पोलीसदलातील जवानाचा मृत्यू झाला. या जवानाचे नाव होते शेवांग पल्जोर. आजच्या घडीला त्याला ‘ग्रीन बूट’ म्हणून ओळखले जाते. याला ग्रीन बूट हे नाव पडले ते मृतदेहाच्या पायातील हिरव्या रंगाच्या बुटामुळे.
आजही जेव्हा उत्तरी मार्गाने गिर्यारोहक एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना या मृतदेहाजवळूनच जावे लागते. अनेकांसाठी हा मृतदेह म्हणजे जणू मैलाचा दगड आहे.. शेवांग पल्जोर या त्याच्या खऱ्या नावाने त्याला कुणीही ओळखत नाही.
तब्बल आठ वेळा एव्हरेस्ट सर करणारे गिर्यारोहक नोएल हाना यांच्या मते एव्हरेस्ट सर करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहक या ग्रीन बूटला ओळखतो. उत्तरी मार्गाने चढाई करणाऱ्या प्रत्येक गिर्यारोहकाच्या मार्गात हा ग्रीन बूट लागतोच. कित्येक जण या शवाच्या शेजारी बसून थोडी विश्रांती घेतात आणि मग राहिलेला पर्वत सर करतात.




