व्हायरल व्हिडीओ: एक पूर्ण SUV मुंबईतल्या खड्ड्यात नाहीशी झालीय, जाणून घ्या या खड्ड्याची खरी गोष्ट!!

व्हायरल व्हिडीओ: एक पूर्ण SUV मुंबईतल्या खड्ड्यात नाहीशी झालीय, जाणून घ्या या खड्ड्याची खरी गोष्ट!!

पाहता पाहता एखादी इमारत कोसळली हा प्रकार मुंबई आणि इतरही मोठ्या शहरांमध्ये अनेकवेळा घडलेला आहे. दोन वर्षांपूर्वी तर पूल कोसळला होता. आता त्याहूनही विचित्र प्रकार समोर आला आहे. पार्क केलेली गाडी काही सेकंदांमध्ये जमीन खचून त्यात बुडाली. 

घाटकोपर येथील एका रहिवासी परिसरातील ही घटना आहे. व्हिडिओ बघितला तर कळेल की काही गाड्या पार्क केलेल्या आहेत. बुडताना दिसत असलेली गाडी बरोबर भराव करून बुजवलेल्या जागेवर उभी होती. गेले काही दिवस जोरदार सुरू असलेल्या पावसाचा परिणाम म्हणून कदाचित ती जागा खचेल अशी झाली असावी.

गाडी तिथे नेहमीप्रमाणे उभी राहिली आणि योगायोगाने तिथली जमीन खचली आणि हळूहळू करत पूर्ण गाडी आत बुडाली. ही गाडी पूर्णपणे त्यात मावली एवढा मोठा तो खड्डा होता.

समाज माध्यमांवर घाटकोपर वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक नागराज मजगे यांच्या नावाने एक संदेश फिरत आहे. त्यानुसार घाटकोपर पश्चिमच्या कामा लेनमागे असलेल्या रामनिवास सोसायटीत एक विहीर होती. त्या विहिरीवर अनेक वर्षांपूर्वी सोसायटीने अर्ध्या भागात आरसीसी करून अर्धी विहीर झाकली होती. मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे  आरसीसी बांधकाम खचले आणि त्या खचलेल्या बांधकामात पंकज मेहता यांची कार पडली आहे. सुदैवाने तिथे कोणतीही मनुष्यहानी झालेली नाही.

हा व्हिडीओ अगदी काही मिनिटांमध्ये देशभर तुफान वायरल होत आहे. लोक मिम्स आणि इतरही माध्यमातून यावर व्यक्त होत आहेत. मात्र या सर्व समस्या ज्या वर्षानुवर्षे जैसे थे आहेत त्यावर मात्र उत्तर सापडत नाहीये.