स्मार्टफोनचे महत्व आजकाल किती आहे हे वेगळ सांगायची काही गरज नाही. प्रत्येक गोष्ट आपण आजकाल स्मार्टफोनवर करत असतो. अगदी मनोरंजन असो किंवा ऑफिसचे काम, शॉपिंग असो वा शाळा, सगळ्याच गोष्ठी स्मार्टफोनवर होत असतात. पण असं म्हणतात ना, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाइटच! तसंच स्मार्टफोनच झालं आहे. तुम्हाला जर वाटत असेल कि स्मार्टफोनपेक्षा आपला जुना मोबाईलच बरा होता, तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण हे "डंबफोन्स" पुनरागमन करत आहेत. पाहूया हे प्रकरण नक्की काय आहे!!
डंबफोन्स म्हणजे ज्यावर इंटरनेट नव्हते. वेगवेगळ्या ॲप्सचा भडीमार नव्हता. कॉल आणि मेसेज एवढ्यापुरता त्याचा वापर होत होता. पण स्मार्टफोनमुळे सतत स़ंपर्कात राहता येते. यामुळेच अनेकांना अवाजवी ताण, चिंतेने ग्रासले आहे. लोकांच्या खाजगी आयुष्यावर गदा येऊ लागली आहे. नकळत इतरांच्या आयुष्याशी आपली तुलना केली जात आहे. लाईक्स मिळवण्याच्या नादात अवाजवी खरेदी, पार्ट्या, पिकनिक्स्, हॅाटेलिंग यांना ऊत आलेला आहे. त्यामुळे यापासून मुक्तीसाठी लोक जुने फोन खरेदी करण्यास इच्छुक दिसत आहेत. एका अहवालानुसार २०१८ ते २०२१ दरम्यान डंबफोन्ससाठी Google सर्चमध्ये तब्बल ८९% वाढ झाली आहे. दुसर्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की गेल्या वर्षभरात डंबफोनची खरेदी ४०करोडवरून एक अब्जपर्यंत पोहोचली आहे. २०२०-२१ मध्ये असे फोन विकत घेण्याचे प्रमाणसुध्दा २०१८-१८ पेक्षा जास्त आढळून आले आहे.
म्हणूनच न्यूयॉर्कच्या कंपनीने नोकिया हँडसेटसारखे डंबफोन तयार करण्याचे ठरवले आहे. फक्त यांना लाईट फोन असे गोंडस नाव आहे. यामध्ये तुम्ही गाणी ऐकू शकाल, ब्लूटूथ वापरू शकाल, पण हा फोन सोशल मिडीयामुक्त असा असेल. यामध्ये सतत बातम्या किंवा ब्राउझर असे नोटीफीकेशन्स त्रास देणार नाहीत. हाताळायला अतिशय हलका, खिशात मावणारा असा हा फोन असणार आहे. याची किमत सध्या $९९ म्हणजे ७,५४२ ₹ इतकी सांगितली जात आहे. याचे भारतात आगमन कधी होणार,इथे याची किंमत किती असेल याची स्पष्टता अजून झाली नाही.
पण वाचकहो, असा फोन बाजरात आल्यास तुम्ही घेण्यास उत्सुक असाल का ?
शीतल दरंदळे
