भारतात सतत उठता-बसता आणि जिकडेतिकडे नुसतं क्रिकेट चालू असतं. त्यामुळं होतं काय, क्रिकेटमधमे जवळजवळ सगळे नियम भारतीयांना माहीत असतात. पण तरी नियमाला अपवाद हा असतोच. टाईम आऊट हा त्यातलाच एक नियम! गंमत म्हणजे त्याचा उपयोग आजवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही झालेला नाही. मात्र प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सहा वेळा हा नियम वापरण्यात आला आहे.
टाईम आऊट म्हणजे जेव्हा क्रिझवर असलेला एखादा खेळाडू आऊट होतो आणि त्यानंतर बॅटिंग करायला येणारा खेळाडू तीन मिनिटांच्या आत मैदानावर आला नाही आणि समोरच्या संघातील खेळाडूंनी त्याविरुद्ध अपील केले तर त्या खेळाडूला आऊट घोषित केले जाते.
सहसा तीन मिनिटे हा वेळ एक खेळाडू आऊट होऊन दुसरा मैदानावर येण्यासाठी पुरेसा असतो. या कारणामुळेच पुढचा येणारा खेळाडू पॅड वैगेरे बांधून अगदी तयार बसलेला असतो. तर असा हा सगळा खेळ आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाही असा कुणी आऊट झाला नसला तरी एकदा मात्र एक भारतीय खेळाडू यातून पुरता वाचला आहे.
तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नाही, तर आज बीसीसीआयचा अध्यक्ष असलेला भारतीय संघाचा 'दादा' सौरव गांगुली होता. दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात कसोटी सिरीज सुरू होती. आधी १-१ अशी बरोबरी होऊन तिसरा सामना सुरू होता. यात पहिल्या इनिंगमध्ये भारताने ४१४ रन केले, त्याला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण आफ्रिकेने ३७३ रन केले.




