स्वामिनी मालिका पाहतापाहता खूप लोकप्रिय झालीय. ऐतिहासिक मालिका लोकांना आवडतात हे त्यामागचं एक कारण. मात्र मालिकेच्या लोकप्रियतेचं हे एकच कारण नाहीय. मोठमोठ्या कलाकारांसमोर धिटाईने उभी राहणारी सृष्टी पगारे, इतर कलाकार, तेव्हाचा उभा केलेला काळ, ' इकडच्या स्वारी'सारखे संवाद हे ही लोकांना जाम आवडतंय. मात्र या सर्वांत मालिकेच्या शीर्षक गीताला विसरून चालणार नाही. सुरवातीची हार्मोनियमची सुरावट, शब्द, संगीत, चाल या सर्वांचा इतका सुरेख मेळ जमून आलाय की बोभाटाच्या प्रतिनिधींना संगीतकार नीलेश मोहरीर यांना फोन करून प्रतिक्रिया कळवल्यावाचून राहवलं नाही. आमच्या विनंतीवरून हे गाणं कसं बनलं, त्यामागे काय विचार होता या सर्व गोष्टी सांगणारा लेख नीलेशनी आमच्यासोबत शेअर केला. या गाण्याचं श्रेय मात्र ते सर्व टीमला देतात. वाचा मग नीलेश यांच्याच शब्दांत स्वामिनीच्या शीर्षक गीताची गोष्ट!!
संगीतकार नीलेश मोहरीरांच्या शब्दांत वाचा स्वामिनी मालिकेचं शीर्षकगीत कसं बनलं याची गोष्ट!!

स्वामीनी मालिकेच्या शीर्षकगीताला सध्या खूप प्रशंसा मिळते आहे. प्राचीन काळातील स्त्री जीवनाचा वेध घेणाऱ्या "उंच माझा झोका" ह्या मालिकेच्या शीर्षकगीतानंतर पुन्हा एकदा त्याच जुन्या ढंगाचं पण तरीही वेगळं असं गाणं स्वरबद्ध करणं हे खरं आव्हान होतं. गाण्यातून फक्त काळ उभा राहत नाही, तर त्या काळाचा रंग-ढंगच प्रतित होत असतो.
स्वामिनीचा काळ हा उंच माझा झोका ह्या मालिकेतील काळापेक्षा १०० वर्ष अधिक जुना आहे. परंतु समाजव्यवस्थेतील कर्मठता टिकून राहिल्याने काळाचा रंग-ढंग हा एकसारखाच. पुन्हा, व्यक्तिरेखा भिन्न असूनही "पातिव्रत्य" हेच दोन्ही मालिकेतील कथानकाचं मर्म. निव्वळ ह्यामुळे विनाकारण दोन गाण्यांची तुलना होण्याचा धोका जाणवत होता. वाहिनी आणि मालिकेच्या निर्मात्यांनाही हीच चिंता वाटत होती. असं असूनही मालिकेचे निर्माते, दिग्दर्शक वीरेन प्रधान आणि कलर्स मराठी वाहिनीचे वरिष्ठ अधिकारी दीपक राजाध्यक्ष आणि निखील साने ह्यांनी संगीतकार म्हणून माझीच निवड केली, ही माझ्या कामाला मिळालेली खूप मोठी पावती आहे असं मला वाटतं. त्यांचा माझ्यावरचा विश्वासच मला ऊर्जा देऊन गेला.

दीपक राजाध्यक्ष (स्रोत)

निखील साने (स्रोत)
शब्द आणि चालीची बांधणी
दोन गाण्यांची तुलना टाळण्यासाठी जुन्या गाण्याच्या छंदापेक्षा इथे वेगळा छंद निवडावा असं वाटत होतं. ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे ह्यांच्याकडे रूपक किंवा दादरा ह्या छंदामध्ये गीतलेखन करण्याचा प्रस्ताव मी मांडला. त्यांच्याशी फोनवर बोलता बोलताच "मी तर स्वामिनी तुझी प्रिया रे" अशी शब्द-सुरांची एक ओळ मनात रुंजी घालू लागली. ही ओळ मी अरुण म्हात्रे ह्यांना गाऊन दाखवली आणि त्यानंतर काही वेळातच अरुणजींनी गाण्याचे शब्द लिहून पाठवले. गीतलेखन एका विशिष्ट दर्जाचे होतेच, त्याला समर्पक अशी चाल होत गेली, आणि बघता बघता स्वामिनीचं शीर्षकगीत साकार होऊ लागलं.
गायक आणि वाद्यवृंद
प्रियांका बर्वे आणि नीलेश मोहरीर
थोडी धीट, थेट आणि अधिक घरंदाज अशी ही चाल असल्याने आता तुलना होणार नाही असा विश्वास वाटू लागला. गाण्याचं वेगळेपण जपलं जावं म्हणून आवाजही वेगळा हवा, गायकीला नाट्यसंगीतातील गमकाचा बाज हवा, त्या दृष्टीने प्रियांका बर्वेची निवड झाली. प्रियांकाने गाण्याला उत्तम न्याय दिला. बासरी, व्हायोलिन आणि सनई अश्या वाद्यांचंही ध्वनिमुद्रण झालं. त्याकरिता अनुक्रमे वरद काठापूरकर, श्रुती भावे आणि योगेश मोरे अशा गुणी वादकांनी आपलं योगदान दिलं. गाणं ध्वनिमुद्रित होऊन पूर्ण झालं. लोकांना ते निश्चित आवडेल अशी खात्री संपूर्ण टीमला वाटत होती. आणि तसंच झालं. गाणं प्रदर्शित झाल्यापासून एकही तुलनात्मक प्रतिक्रिया आली नाही. सगळ्या प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक होत्या.
लोकांचा प्रतिसाद
रसिकांसोबत काही संगीत-तज्ञ आणि समालोचक मंडळींनी देखील गाण्याचं कौतुक करत ह्या चालीतील काही सुरावटी ह्या सिंधुरा रागाकडे खुणावत असल्याचं सांगितलं. आज गाण्याबद्दल नुसतं लिहिलंच जात नाहीये तर अनेकांनी हे गाणं आपल्या आवाजात गाऊन त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर तो शेअर केला आहे व त्यात ते आम्हा कलाकारांना टॅग करत आहेत. हे ह्या गाण्याचं खरं यश आहे.
तंत्रज्ञ टीम
पण हे यश माझं एकट्याचं किंवा फक्त म्युझिक टीमचं नाही. त्यात निर्माते, दिग्दर्शक, वाहिनीचे अधिकारी आणि त्याच बरोबर माझे तंत्रज्ञ (निलेश डहाणूकर - संगीत संयोजन, अवधूत वाडकर, नितीन कायरकर, सौरभ काजरेकर - ध्वनिमुद्रण व अजिंक्य ढापरे- ध्वनी मिश्रण) ह्यांचं योगदानही मोलाचं आहे. आज गाण्याला मिळणारं प्रेम आणि चाहत्यांचा उदंड प्रतिसाद बघून मन भरून येतं. "पाखडले प्रेम अंगणी" ह्या गाण्यातील ओळी प्रमाणे आम्ही सर्व कलाकार अतिशय कृतज्ञतेने रसिकांचं प्रेम वेचून घेत आहोत.
- नीलेश मोहरीर