नोकरदारांच्या आयुष्यात बॉस नावाचा मनुष्य अतिशय महत्वाचा असतो. बॉसने सांगितलेले तुम्हाला पटो किंवा ना पटो, yes boss म्हणण्याशिवाय पर्याय नसतो. ज्यांना चांगले बॉस मिळतात ते नशीबवान! तर काहीजण म्हणतात बॉस हा फक्त वाईटच असतो.म्हणजेच, बहुतेकांचं बॉसविषयी फारसं चांगलं मत नसतंच. आज आपण जगातल्या भयानक बॉसची यादी पाहूयात. या सर्वांनी फार विचार न करता कर्मचाऱ्यांना छळले आणि कामावरून काढून टाकले. सर्वात महत्वाचे म्हणजे या सर्व सत्य घटना आहेत.
जगातले सर्वात वाईट ७ बॉस!! तुमचा बॉस कसा आहे?


१. सध्या चर्चेत असलेले सर्वात वाईट बॉस आहेत Better.com चे CEO विशाल गर्ग. या महाशयांनी झूम कॉलवर ९०० लोकांना कामावरून काढून टाकले. अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील या सीईओने अवघ्या तीन मिनिटांत ९०० जणांना नोकरीवरून कमी केले. मागील आठवड्यात बुधवारी झालेल्या बैठकीत विशाल गर्ग यांनी झूम मिटिंग बोलावली. ही बैठक नेहमीप्रमाणे कामाशी संबंधित आहे असे कर्मचाऱ्यांना वाटले, पण अनपेक्षितरित्या त्यांना कामावरून काढले तेव्हा धक्का बसला. हा व्हिडिओ इंटरनेटवर बराच व्हायरल झाला होता. यामुळे खूप गदारोळ उठला होता. विशाल गर्ग यांच्यावर या गोष्टीमुळे बरीच टीका झाली होती. झूम कॉल करताना त्या कर्मचाऱ्यांनाविशाल गर्गनी सांगितले, "जे जे या कॉल मध्ये सहभागी आहेत त्यांना सर्वांना या क्षणापासून नोकरीवरून काढून टाकण्यात येत आहे."

२. स्कॉट रुडिन हॉलीवूडच्या सर्वात यशस्वी निर्मात्यांपैकी एक! रुडिनच्या चित्रपटांनी २३ ऑस्कर जिंकले आहेत. तसेच १७ टोनी पुरस्कार जिंकले आहेत. कमाईमध्येही तो सर्वात आघडीवर आहे. पण त्याच्या वाईट स्वभावामुळे तो पूर्ण हॉलीवूडमध्ये बदनाम आहे. लोकांवर वस्तू फेकणे, त्यांच्यावर गोळीबार करणे. त्याच्या मनासारखे काम झाले नाहीतर लॅपटॉप फोडणे, वर्णद्वेशी टीपणी करणे अश्या विचित्र वागणूकीमुळे त्याच्यावर केसेसही झाल्या आहेत.

३. जॉर्ज स्टीनब्रेनर हे अमेरिकेतील मोठे व्यवसायिक आणि न्यूयॉर्क यँकीजचे प्रमुख आहेत. न्यूयॉर्क यँकीज ही सुप्रसिद्ध बेसबॉलची टीम आहे. बेसबॉलच्या लीगमध्ये अनेक टीम खेळवल्या जातात, त्यात न्यूयॉर्कची यँकीजचे प्रमुख स्टीनब्रेनर हे खूप वादग्रस्त मालक होते. त्यांनी खेळाडूंना शेव्हींग न केल्यामुळे काढून टाकले होते. तसेच संघातल्या खेळाडूची कामगिरी चांगली न झाल्यास त्यांना अपमानास्पद ओरडणे, वाईट वागणूक देणे यासाठी ते प्रसिद्ध होते.२०१० साली स्टीनब्रेनर यांचा मृत्यू झाला.
४. कुठलीही शस्त्रक्रिया यशस्वी किंवा अयशस्वी झाली या कारणावरून नोकरी गेली तर कसे वाटेल? न्यूझिलंडच्या मरे गार्डिनरची बायपास शस्त्रक्रिया झाली, त्याचा बॉस त्याला हॉस्पिटलला भेटायला आला. बॉस त्याची तब्येतीची विचारपूस करायला आला नव्हता, तर त्याला कामावरून काढून टाकायला आला होता. कारण बॉसला वाटले मरेची बायपास शस्त्रक्रिया अयशस्वी झाली. पण खरे तर शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. मरेने आपल्या आयुष्याची ११ वर्षे त्या कंपनीत काम केले होते.

५. पगारकपात झाली तर कर्मचारी नाराज होणे स्वाभाविक आहे. बोलणी यशस्वी झाली नाही तर कधीकधी आंदोलन करायची वेळ येते. रशियातील एका मिनीबस कंपनीत तसेच झाले. कर्मचाऱ्यांनी पगारकपात झाली म्हणून आंदोलन केले तर बॉसने त्यांच्याशी बोलण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गोळीबार केला आणि त्यांचे पासपोर्ट हिसकावून घेतले. त्या गोळीबारात जखमी झालेल्या एका कर्मचाऱ्याचा मृत्यूही झाला होता.
६. बॉसला कधी गरज लागली तर मदत करणे हे ही माणुसकी असते. पण डेबी स्टीव्हन्सला तर खूप मोठा पश्चाताप करावा लागला. डेबीने आपल्या बॉसला किडनी दान केली, पण त्यानंतर होणाऱ्या वेदनेमुळे तिला लगेच ऑफिसला येता आले नाही. याच कारणावरून तिला तिच्या बॉसने काढून टाकले. तिची आधी बदली करण्यात आली आणि शेवटी तिला कामावरून काढून टाकण्यात आले.

७. सोशल मीडियावर केलेल्या एका लाईकमुळे एका कर्मचाऱ्याला कायमचं घरी बसण्याची वेळ आली होती. LGBTQ फेसबुक पेज लाइक केल्याबद्दल एका कर्मचाऱ्याला त्याच्या बॉसने काढून टाकले. त्याला त्या लाईकमुळे सतत ट्रोल केले गेले. त्याच्या लैंगिकतेला पाठिंबा देण्यामुळे त्याला चुकीचे ठरवले गेले आणि त्याचे मानसिक खच्चीकरण करण्यात आले. याचा त्या कर्मचाऱ्याला प्रचंड त्रास झाला. त्याने थेरपिस्टची मदत घेण्यासाठी रजा घेतली, ती मंजूरही झाली. पण तो परत आला तेव्हा त्याला कळले की त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते.
हे असे बॉस कोणाच्या नशिबात नको यायला, असेच म्हणावे लागेल.
शीतल दरंदळे