सद्या निकालांचे दिवस आहेत. सीबीएसई, एसएससी, एचएससी बोर्डांचे निकाल लागले आहेत. टॉपर्सचे फोटो तुम्ही पेपरांमध्ये, बॅनर्सवर बघितले असतील. काहींना तर १००पैकी १०० मार्क पडल्याचे पण तुम्ही ऐकले असेल. त्यांचे कौतुक ऐकून कित्येक विद्यार्थ्यांना टेन्शन आले असेल, तर अनेकांना आई वडिलांचे टोमणे ऐकावे लागले असतील. पण मंडळी, या मार्क्सपेक्षा जास्त महत्वाचे समजले जातात ते तुमचे इन्ट्रन्स परीक्षेतले मार्क्स!! तुम्हाला ज्या फिल्डमध्ये करीयर करायचे असेल त्या फिल्डची वेगळी प्रवेश परीक्षा दिल्याशिवाय पुढची ॲडमिशन होत नाही ना भाऊ!
त्या परीक्षांमध्ये पास होणाऱ्या विध्यार्थ्यांना चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळते. या परीक्षा पास होण्यासाठी मुलं रात्रंदिवस एक करतात राव!! अक्षरशः भान विसरून पोरं मेहनत करत असतात. तरी कित्येकांना अपयशी व्हावे लागते. अकरावी आणि बारावी अशी दोन वर्षे म्हणजे मुलांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट असतो. ही दोन वर्षे मेहनत घेतली म्हणजे पुढचे आयुष्य आरामात जाते हे त्यांना सगळेजण सांगत असतात. पण य असल्या मार्कांच्या जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी फक्त मेहनत घेऊन चालत नाही ना राव!! त्यासाठी हार्डवर्कसोबत स्मार्टवर्कची पण गरज असते. तर मंडळी, एवढया कठीण परीक्षा असताना त्यात पास होणे म्हणजे शिवधनुष्य पेलणे. पण दोन वर्षे सलग मेहनत घेऊन पोरं पास होतातच. एकच प्रवेश परीक्षा पास होणे एवढे कठीण असते हे तर तुम्हांला स्वत:च्या अनुभवावरुन किंवा ऐकून माहित असेलच. पण जर तुम्हाला असे सांगितले कि एका मुलीने सगळ्या प्रवेश परीक्षा पास केल्या आहेत, एवढेच नाहीतर सगळ्या परीक्षांमध्ये ती टॉपर्सच्या यादीत आहे तर? तुम्ही म्हणाल,"काय फेकताय राव, इथे एक परीक्षा निघत नाही आणि तुम्ही सगळ्या परीक्षांबद्दल बोलत आहात". पण मंडळी, हे खरे आहे. एवढेच नाहीतर तिने आणखी एक मोठा पराक्रम केला आहे. पण आधी कोण आहे ती विद्यार्थीनी ते तर जाणून घेऊया....
असे भव्यदिव्य यश मिळवणारी ती विद्यार्थीनी आहे सुरतमधली स्तुती खांडवाला!! तिने फक्त परीक्षा पास नाही केल्यात, तर सर्वात कमी वयात सर्व इन्ट्रन्स पास केल्याचा रेकॉर्डसुद्धा तिने स्वतःच्या नावावर केले आहे. तिने JEE मेन्स 2019, NEET 2019, AAIMS MBBS 2019 आणि JIPMER MBBS 2019 अशा आणि इतक्या सगल्या परीक्षा पास केल्या आहेत. मंडळी, या सगळ्या पास होताहोता एखाद्याचे पूर्ण आयुष्य संपेल, पण या पोरीने ते अगदी कमी वयात करून दाखविले आहे. पास झाली तर झाली, वरून सगळ्यांमध्ये टॉपर्समध्ये आहे राव!! असा कसा अभ्यास करत असेल राव ही पोरगी!!
कोटाबद्दल तुम्हाला माहीत असेलच मंडळी!! कोटाला पोरं वेगवेगळ्या इन्ट्रन्सच्या तयारीसाठी जातात. तिथं जाऊन अक्षरशः मशिन्ससारखी अभ्यासाला लागलेली असतात राव!! कोटाचे जीवन कसे असते यावर सध्या कोटा फॅक्टरी नावाची वेब सिरीज पण गाजतेय. तर ही पोरगी पण कोटाच्या ॲलन क्लासमध्ये शिकली आहे. जी परीक्षा द्यायची ती टॉपच करायची हे ठरवलेलेच दिसते राव या पोरीने. कारण बोर्डसच्या परीक्षेत सुद्धा ९८ टक्के मिळवून राजस्थानमध्ये स्तुतीने पहिला नंबर मिळवला आहे. AAIMS MBBS मध्ये भारतात १० वा क्रमांक, NEET मध्ये भारतात ७१ वा क्रमांक तर JIPMER MBBS मध्ये भारतात २६ वा क्रमांक मिळवून तीने सगळ्यांना बोटे तोंडात घालायला लावली आहेत राव!!
पण इतक्या कमी वयात एवढे मोठे यश मिळवणारी स्तुती इथे थांबली तर नवलच! वर सांगितल्याप्रमाणे तिचा सर्वात मोठा पराक्रम सांगायचा राहिला आहे ना राव!! स्तुतीला जगातल्या टॉप युनिव्हर्सिटीपैकी एक असलेल्या एमआयटी इन्स्टिट्यूटने त्यांच्या युनिव्हर्सिटीत शिकायला येण्याची ऑफर दिली आहे. मंडळी, भारतात तर भारतात, आता जगात पण स्तुतीचा डंका वाजणार आहे. खऱ्या अर्थाने स्तुतीमुळे आता जगभरात भारताची स्तुती होत आहे. अशा मुली आपले वैभव आहेत. त्यांच्या आजच्या यशामागे मोठी मेहनत, घरच्यांचा पाठिंबा अशा खूप गोष्टी असतात.
