मुंबई आणि पाऊस यांचे एक अतूट नाते आहे. मुंबईतला पाऊस फक्त भिजवत नाही तर धडकीही भरवतो. पावसामुळे तुंबणारी गटारे, पावसाच्या पाण्याने भरणारी घरे, वाहून जाणारी वाहने अश्या त्रासदायक घटना आपण बातम्यांमध्ये नेहमी बघत असतो. मुंबईत या समस्या दर पावसाळ्यात येतात. अजून एक समस्या दर पावसाळ्यात सगळीकडेच घडताना दिसते ती म्हणजे पडणारी झाडे आणि त्यामुळे घडणारे अपघात. या समस्येवर बीएमसीने एक नवीन उपाय शोधून काढला आहे.
दरवर्षी पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे मोठ्या संख्येने झाडांचे नुकसान होते. तसेच झाडे किंवा फांद्या पडल्याने अपघातही घडतात. या सर्वाचा विचार करून बीएमसीने झाडांची देखरेख आणि त्यांचे मुल्यांकन करण्यासाठी आर्बोरिस्टची नियुक्ती केली आहे. म्हणजे सर्वसामान्याच्या भाषेत झाडांच्या डॉक्टरची नियुक्ती केली आहे. अशी नियुक्ती भारतात कुठल्याही राज्यात पहिल्यांदाच केली गेली आहे.


