हेडलाईट हा कुठल्याही कारमधील महत्वाचा भाग असतो. रात्रीचा प्रवास म्हटला म्हणजे हेडलाईट हा सर्वात मोठा खिलाडी असतो. कारच्या पुढे सुरू असलेला लाईटसमोर येणारी प्रत्येक गोष्ट दाखवत असतो. हाच हेडलाईट समोरच्या ट्रॅफिकबद्दलही सावध करतो. या हेडलाईट्समध्ये जसजसे तंत्रज्ञान बदलत आहे तसे अनेक प्रकार येत आहेत. आधी कार्समध्ये कार्बाईड लॅंप्सचा वापर केला जात असे. पण सध्या महाग कार्समध्ये लेझर लॅम्प्सचा वापर वाढत आहे. आज या लेझर हेडलाईट आणि हेडलाईटचे इतरही प्रकार आपण समजून घेणार आहोत
आपल्या वाहनातले पाच प्रकारचे हेडलाईट्स!! तुमच्या वाहनात यातले कोणते आहेत?


१. हॅलोजन
हॅलोजन हे हेडलाईट जगभर वापरले जातात. यात सोप्या पद्धतीने हॅलोजन गॅस आणि टँगस्टन धातूच्या तारने ग्लास कॅप्सूल भरलेला असतो. हेडलॅंप्स सुरू केले जातात तेव्हा टंगस्टन धातूमधून वीज पास होते. यामुळे उष्णता निर्माण होऊन लाईट चमकतो. याचमुळे हॅलोजन लाईट पिवळा प्रकाश देतात. पण काचेतील हॅलोजन गॅस हा उष्णता रोधक असल्याने हॅलोजन हेडलाईट खूप एनर्जी वाया घालवतो.

२. झेनॉन
झेनॉन किंवा एचआयडी हे बरेचसे सीएफएलसारखे असतात. यात एचआयडी म्हणजे हाय इंटेंसिटी डीस्चार्ज, तर सीएफएल म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लूरोसेन्ट लाईट. हे सीएफएल आपण जे घरात वापरतो तेच असतात. यांच्यात कुठलाही धातू नसतो. यात जी मोकळी जागा असते, त्यात झेनॉन गॅस भरलेला असतो. हाय व्होल्टेज दोन इलेक्टरोड्सच्या माध्यमातून पास होते आणि गॅस चमकायला लागतो. एचआयडी हेडलाईट्सची खालची बाजू ही तापायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे फुल ब्राईटनेस यायला वेळ लागतो. याच कारणाने एचआयडी हेडलाईट्स हाय बिम्सऐवजी इतर हेडलाईट्स सोबत वापरले जातात. एचआयडी लाईट्स सहसा निळ्या रंगाचे असतात.

३. एलईडी
लईडी म्हणजे लाईट इमिटिंग डायोड्स हे इतर हेडलाईट्सपेक्षा सोपे असतात. एलईडीला कुठलेही हिट लागत नाही. याचमुळे एनर्जी एफिशियन्ट म्हणूनही ओळखले जातात. एलईडी हे अनेक आकारात असतात, म्हणून ते डेटाईम रनिंग लॅम्प्स म्हणून वापरले जातात.

४. मॅट्रिक्स
मॅट्रिक्स हेडलाईट्स हे ऍडाप्टीव एलईडी हेडलाईट्स म्हणून ओळखले जातात. रस्त्यांवर कार गेल्यावर अनेक विशिष्ट असे एलईडी चमकताना मॅट्रिक्समुळे दिसतात. मॅट्रिक्स लावलेल्या कार्सच्या हेडलाईट्समध्ये एक कॅमेरा असतो जो रस्त्यावरील ट्रॅफिक सांगण्यास मदत करतो. जेव्हा समोरून एखादी कार येते तेव्हा कॉम्प्युटर हे विशिष्ट हेडलाईट्स बंद करतो ज्यामुळे समोरच्या ट्रॅफिकला अडचण येत नाही. याच कारणाने जेव्हा समोरून गाड्या येतात तेव्हा ड्रायव्हरला लाईट बिम करावा लागत नाही. कारण हे काम ऑटोमॅटिकली या मॅट्रिक्स हेडलाईट्समुळे होते.

५. लेझर
लेझर हे सर्वात महाग आणि ऍडव्हान्स क्वालिटीचे हेडलाईट्स समजले जातात. बाजारात असलेल्या हेडलाईट्सपैकी हे सर्वात क्लास असे हेडलाईट्स असतात. हे लाईट चमकण्यासाठी लेझर बीमचा वापर करतात हे तुम्हाला नावावरून तर लक्षात आले असेलच. हे हेडलाईट्स कारखान्यातून ऑप्शनल हेडलाईट्स म्हणून दिले जातात. लेझर हेडलाईट्स असलेल्या कारची किंमत महाग असण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे या हेडलाईट्सचे महाग असणे हे देखील आहे. या लेझर हेडलाईट्सची चमकण्याची रेंज ही तब्बल ६०० मीटरपर्यंत असते.
उदय पाटील