झेब्रा त्याच्या विशिष्ट काळय़ा-पांढ-या पट्टय़ामुळे नेहमी लक्षात राहतो. या पट्टयांमुळे तो सर्वाच्या नजरेत भरतो. जवळ जाऊन पाहिल्यावर हे पट्टे अजून छान वाटतात. पण एक गोष्ट लक्षात येत नाही की झेब्राच्या अंगावर पांढरे पट्टे असतात की काळे असतात? म्हणजेच त्याचे अंग नक्की काळे असते आणि त्यावर पांढरे पट्टे असते की त्याचे अंग पांढरे असते आणि त्यावर काळे पट्टे असतात?? हा एक कोंबडी आधी की अंडेसारखा जोक वाटू शकतो. पण या पट्ट्याचा रंग कशामुळे ठरतो आणि झेब्राला त्याचा उपयोग कशाप्रकारे होतो याची माहिती घेऊयात.
झेब्रा नीट पाहिल्यास त्याच्या फरखाली काळी त्वचा असते. झेब्राचे बहुसंख्य केस पांढरे असतात. हे पांढरे केस पोटावर आणि पायांच्या आतील बाजूस असतात.
जेव्हा झेब्रा व त्यांच्या पट्टयांचा शास्त्रशुद्ध अभ्यास सुरू झाला तेव्हा त्यांना चार प्रकारचे पट्टे झेब्रांच्या शरीरावर आढळले. काही झेब्रांच्या साऱ्या शरीरावर पट्टे उमटलेले असतात, तर काहींच्या पायावर कमी किंवा एकही पट्टा नसतो. काहींच्या पृष्ठावर जाड पट्टयांबरोबरच काही विरळ पट्टेसुद्धा असतात. त्यामुळे प्रत्येक झेब्राच्या अंगावर पट्टे वेगळे आढळून येतात.

