भारतीय महिला क्रिकेट संघाची (Indian women's team) सलामीवीर फलंदाज स्मृती मंधाना (Smriti mandhana) हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला आहे. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक ५ हजार धावा (Smriti mandhana completed 5000 runs) पूर्ण केल्या आहेत. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२२ स्पर्धेतील (icc women's World cup 2022) साखळी सामन्यादरम्यान तिने ही कामगिरी केली आहे. स्मृती मंधानाने आतापर्यंत या स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. तिने आतापर्यंत २५० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
स्मृती मंधानाने आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेत बांगलादेश संघाविरुद्ध झालेल्या साखळी सामन्यात हा कारनामा केला आहे. तिने १७ वी धाव पूर्ण करताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५ हजार धावा पूर्ण करण्याचा पल्ला गाठला. बांगलादेश विरुद्ध झालेल्या सामन्यात तिने ३० धावांचे योगदान दिले. तिने ५१ चेंडूंचा सामना करत ३ चौकारांच्या साहाय्याने ३० धावा केल्या. ती या डावात देखील चांगली फलंदाजी करत होती. परंतु तिला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
डाव्या हाताची विस्फोटक फलंदाज स्मृती मंधानाने आतापर्यंत महिला वनडे क्रिकेटमध्ये २७१७ धावा केल्या आहेत. तसेच कसोटी क्रिकेटबद्दल बोलायचं झालं तर, तिने आतापर्यंत एकूण ३२५ धावा केल्या आहेत. तसेच टी२० क्रिकेटमध्ये तिने १९७१ धावा केल्या आहेत. अशाप्रकारे तीनही स्वरूपात मिळून तिने ५ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यापूर्वी असा कारनामा मिताली राज (Mithali raj) आणि हरमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) यांनी केला आहे.
