अमेरिकेतल्या औषध कंपन्यांमध्ये कुप्रसिद्ध असलेले नाव म्हणजे मार्टीन श्क्रेली! ‘फार्मा ब्रो’ म्हणजे औषध क्षेत्रातील दादा या टोपण नावानेही तो प्रसिध्द आहे. त्याने केलेले अनेक घोटाळे आणि गैव्यवहारप्रकरणी त्याला दंड व औषध क्षेत्रात आजन्म बंदी घालण्यात आली आहे. तसेच ६४.६ मिलियन दंडही ठोठावला आहे. चौदा जानेवारीला हा निकाल लागला. हा खटला सात राज्य व फेडरल गव्हर्मेंटने दाखल केला होता. अमेरिकेत मार्टीन श्क्रेलीला मिळालेल्या शिक्षेचे अनेकांनी स्वागत केले आहे. मार्टीन श्क्रेलीने असे नक्की केले काय? तो 'फार्मा ब्रो’ कसा झाला याची कहाणी आपण पाहूयात.
असा चालतो औषधांचा अधिकृत काळाबाजार : एका रात्रीत औषधाची किंमत हजारो पटीने वाढवणारा मार्टीन श्क्रेली कोण आहे ?


मार्टिन हा अमेरिकन उद्योजक, फार्मास्युटिकल एक्झिक्युटिव्ह आणि स्टॉक-मार्केट विश्लेषक आहे. पण तो सध्या एका फसवणूकीप्रकरणी ७ वर्षांपासून शिक्षा भोगत आहे. मार्टिन म्हणजे अमेरिकेतला सर्वात जास्त द्वेष पसरवणारा माणूस. मार्टिनने त्याच्या सोशल मीडियाचा उपयोग सर्वांवर टिका करण्यासाठीच केला होता. आक्षेपार्ह पोस्ट केल्याने त्यांचे 'ट्विटर' खाते सुद्धा बंद करण्यात आले होते. जास्त करून तो त्याच्या अपमानजनक वर्तनासाठी आणि अपमानजनक कृत्यांसाठी ओळखला जातो. मे २०१७ मध्ये,पत्रकार लॉरेन ड्यूकवर त्याने अपमानास्पद टीका केली तेव्हा मार्टिनचे ट्विटर खाते हटविण्यात आले. मग त्याच वर्षी त्याने त्याच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली की जो कोणी हिलरी क्लिंटनचे केस कापून आणेल त्याला तो $५,००० देईल. नंतर त्याने त्याबद्दल माफीही मागितली. पण त्याचे वागणे बदलले नाही.

मार्टीन श्क्रेलीचे बालपण:
मार्टिन शक्रेलीचा जन्म १ एप्रिल १९८३ ला ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे झाला. त्याचे शिक्षण कॅथलिक कायद्यांनुसार झाले, रविवारच्या शाळेत तो शिकला. मार्टिनला एक भाऊ आणि दोन बहिणी आहेत. त्यांने हंटर हायस्कूल (कॉलेज) येथे शिक्षण घेतले. पण शिक्षण अर्धवट सोडले. परंतु आवश्यक डिप्लोमामुळे वॉल स्ट्रीटवरील हेज फंडमध्ये त्याला इंटर्नशिप मिळाली. त्यामुळे तो वयाच्या १७ व्या वर्षी कामाला लागला. नंतर त्याने २००४ मध्ये अर्थशास्त्राची पदवी घेतली. त्याला आवड असल्यामुळे त्याने स्वतः औषध बनवण्यास सुरुवात केली. त्याने हेज फंड 'एमएसएमबी कॅपिटल मॅनेजमेंट', बायोटेक्नॉलॉजी फर्म 'रेट्रोफिन' आणि 'ट्युरिंग फार्मास्युटिकल्स' यांची सह-स्थापना केली. रेट्रोफिन आणि ट्युरिंगचे सीईओ म्हणूनही तो काम करत होता.

डाराप्रिम घोटाळा:
२०१५ साली ‘डाराप्रिम’ या पूर्वीपासून प्रचलित असलेल्या ‘टोक्सोप्लास्मासिस’ या रोगावरील औषधाच्या किंमतीमधे फेरफार त्याने केला. त्याने केलेल्या हस्तक्षेपामुळे या औषधाची किंमत एका रात्रीत सुमारे ४,०००% ने म्हणजेच १३.५०$ पासून ७५०$ अशी वाढली होती! औषध क्षेत्रातील मक्तेदारी टिकवण्यासाठी औषधाच्या किमती वाढविण्याचा गैरव्यवहार त्याने केला होता. जीवनावश्यक औषधांच्या किंमतीमध्ये त्याने साठवणूक करून वाढ केली होती. त्याने जेनेरिक कंपन्यांना ‘डाराप्रिम’ हे औषध तयार करण्यापासून किमान अठरा महिने थांबविले आणि त्यादरम्यान किंमती वाढवत नेल्या. या काळात त्यांच्या कंपनीला चौसष्ठ मिलियन डॅालर्स एवढा नफा झाला. या संदर्भात भूतपूर्व राष्ट्राध्यक्ष डॅानाल्ड ट्रंप आणि त्यावेळच्या डेमॅाक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यानी देखील त्याचा निषेध केला होता. त्याने स्पर्धक कंपन्यांना रोखण्यासाठीही काही गैरव्यवहार केले होते. पेटंट नसलेले जेनेरिक औषध, जे एड्स आणि गर्भवती महिलांच्या उपचारात वापरले जाई त्या संदर्भात हा गैरव्यवहार झाला होता.

मार्टीनला दंड आणि शिक्षा
डाराप्रिम या औषध निर्मिती घोटाळ्यात बदनाम झालेल्या मार्टीनवर सात राज्ये व फेडरल गव्हर्नमेंटने खटला दाखल केला होता. अमेरिकन फेडरल कोर्टाने नुकताच हा निकाल दिला. जज डेनिस कोट यांनी हा व्यवहार करताना कमावलेला नफा ६४.६ मिलियन डॅालर्स दंड म्हणून आकारला आहे. तसेच औषध क्षेत्रात त्याला आजन्म बंदी घालण्यात आली आहे
सरकारी वकिलांनी या निर्णयानंतर आनंद व्यक्त करून असे म्हणले की आता अमेरिकन नागरिकांना औषधांच्या किंमतीची काळजी करायचे कारण नाही कारण ‘ फार्मा ब्रो’ चा निःपात झाला आहे.

२०१६ मध्ये ट्युरिंग या कंपनीतील गुंतवणूक वापरून गैरव्यवहार करत रेट्रोफिन नावाची कंपनी स्थापन केल्याचाही आरोप त्याच्यावर आहे. आपल्या विक्षिप्त वागणूकीसाठी तो पॅाप कल्चरमध्ये फार्मा ब्रो या नावाने प्रसिध्द झाला. वू टांग क्लॅनचा “Once upon a time in Shaolin,” हा one of a kind, अल्बम दोन मिलियन डॅालर्सना विकत घेतल्यामुळेही तो चर्चेत होता. हा दुर्मिळ अल्बम अमेरिकन सरकारने २०१७ साली झालेल्या ७.३ मिलियन दंडाच्या वसुलीत लिलावात काढला होता. .२०२० साली त्याने कोविड-१९ वरील औषधाच्या संशोधनासाठी तुरूंगात सुटका व्हावी असा अर्जही त्याने केला होता.
असा हा ‘फार्मा ब्रो’ जेव्हा त्याला शिक्षा ठोठवण्यात आली तेव्हा कोर्टात दयेची भीक मागताना दिसून आला. आतापर्यंत त्याने अनेक फेरफार आणि घोटाळे केले आहेत. त्याची शिक्षा तो भोगतच आहे.
अमेरिकन औषध कंपन्यांनी जगाला फसवण्याची अनेक उदाहरणे आहेत. औषधाच्या किमती अव्वाच्या सव्वा लावून त्या विक्रीस आणायच्या. औषधे साठवून त्याच्या किमती वाढवायच्या . तिथली बाद झालेली औषधे बाहेरच्या देशांना विकून नफा कमवायचा. मार्टीन श्क्रेली सारखी माणसं जेव्हा अशी फसवणूक अमेरिकेत करतात तेव्हा या गोष्टी बाहेर येतात.
शीतल दरंदळे