सामान्य माणसाला एखाद-दुसरा काळवीट दिसणे ही देखील मोठी गोष्ट. कारण काळवीट सहसा संरक्षित परिसरात आढळतात. तेथून एखाद दुसरा व्हिडीओ किंवा फोटो येत असतो. पण सध्या शेकडो काळवीटांचा व्हिडीओ वायरल होत आहे.
हा व्हिडीओ आहे गुजरातच्या वेलावदर येथील काळवीट नॅशनल पार्कमधला. गुजरातच्या माहिती विभागाकडून हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. ट्विटमध्ये म्हटल्याप्रमाणे तब्बल ३,००० काळवीट रस्ता ओलांडत आहेत.
हा व्हिडीओ बघितल्यावर पक्षांचा थवा उडत आहे की काय असावे वाटावे इतक्या वेगात हे काळवीट रस्त्यावरून उड्या मारून जात आहेत. डोळ्यांचे पारणे फेडणारा असा निसर्गाचा आविष्कार या निमित्ताने पाहायला मिळत आहे. प्राणीप्रेमींसाठी तर पर्वणी म्हणावी असा हा क्षण आहे.
Over 3000 blackbucks were seen crossing the road at Bhavnagar's Blackbuck National Park.
— Gujarat Information (@InfoGujarat) July 28, 2021
pic.twitter.com/ddjsAU6bMH
काळवीट पाहण्यासाठी नॅशनल पार्क गाठावा अशी परिस्थिती असताना घरबसल्या हा व्हिडिओ पाहता येऊ शकतो. त्यातही इतक्या सुंदर पध्दतीने जाणारे काळवीटांचे पथक नॅशनल पार्कमध्ये पण पुन्हापुन्हा दिसणार नाही. याचसाठी हा व्हिडीओ महत्वाचा आहे.
काळवीट हे १९७२ सालच्या कायद्याने संरक्षित आहेत. त्यांची शिकार करणे हा गुन्हा मानला जातो. तरीही सातत्याने होणाऱ्या शिकारीमुळे आणि वनतोडीमुळे दिवसेंदिवस काळविटांची संख्या कमीकमी होत आहे.
वेलावदर नॅशनल पार्क हे भावनगरहून तासाभराच्या अंतरावर आहे. हे नॅशनल पार्क काळवीटांसाठीच प्रसिद्ध आहे. खंबाटच्या आखाताला अगदी खेटून असलेला हा पार्क जवळपास ३४ चौरस किमीच्या परिसरात पसरलेला आहे.
तर तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला हे आम्हाला कॉमेंटबॉक्समध्ये नक्की कळवा.
