२००६ मध्ये रिलीज झालेला ‘रंग दे बसंती’ हा चित्रपट तुम्हाला आठवतो का? आमिर खान, सिद्धार्थ, अतुल कुलकर्णी, सोहा अली खान यांच्यासह आर. माधवन अशी तगडी स्टारकास्ट. ए. आर. रेहमानचे संगीत. दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचे जबरदस्त दिग्दर्शन. हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला होता. सगळी गाणी हिट झाली होती. रुबरु, अपनी तो पाठशाला, रंग दे बसंती ही सगळी गाणी तरुणाईच्या तोंडी होती. फिल्मफेअरसह राष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटाने पटकावले. गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि अकादमी पुरस्कारांमध्ये भारताने रंग दे बसंती पाठवला होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेच्या चित्रपटाच्या श्रेणीत ठेवण्यात आले होते.
इतक्या वर्षानंतर या चित्रपटाची आठवण काढायचे कारण म्हणजे दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी या चित्रपटातील स्टारकास्ट विषयी एक नवा खुलासा केला आहे. त्यांच्या 'द स्ट्रेन्जर इन मिरर' या आत्मचरित्रात त्यांनी सांगितले आहे की या चित्रपटासाठी हॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेगने ऑडिशन दिली होती. स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देणार्या ब्रिटिश जेलरच्या भूमिकेसाठी डॅनियल क्रेगने ऑडिशन दिली होती. पण त्यावेळी जेम्स बाँड करण्याची संधी चालून आली आणि डॅनियलने रंग दे बसंती नाकारला.





