काही वनस्पतींचे आयुष्य फक्त काही तासांचे असते, तर काही वनस्पती मात्र शेकडो वर्षे जगतात. हे तर तुम्हाला माहिती असेलच, पण हजारो वर्षांपूर्वीपासून पृथ्वीवर अस्तित्वात असलेली वनस्पती तुम्ही कुठे पहिली आहे का? पृथ्वीवरील सर्वात जुन्या वनस्पतीचे वय किती, तिचे नाव काय आणि ती सध्या कुठे आढळते तुम्हाला माहिती आहे?
लोमाशिया टास्मानिका ही पृथ्वीवरील सर्वात जुनी वनस्पती आहे. पृथ्वीवरील सर्वात जुनी मानली गेलेली ही वनस्पती सुमारे ४३,६०० वर्षांपासून पृथ्वीवर आपले अस्तित्व टिकवून आहे, म्हणूनच तिला पृथ्वीवरील सर्वात जुनी वनस्पती म्हटले जाते. या वनस्पतीला गुलाबी रंगाची छोटी नाजूक फुले येतात, पण तिला फळ लागत नाही किंवा फुलही तयार होत नाही. या झाडाची वाढही खूपच हळूहळू होते. थोडेसे मोठे झालेल्या झाडाची एक फांदी तुटून खाली पडली की ती त्याच ठिकाणी रुजते आणि तिथे याचप्रकारचे नवीन झाड उगवते. अशाप्रकारे हे झाड स्वतःच स्वत:ची पुनर्निर्मिती करत असते. आज या प्रकारची फक्त ३०० झाडे पृथ्वीवर आढळतात तीही एकाच ठिकाणी. त्यामुळे कालांतराने इतर वनस्पती आणि प्राण्याप्रमाणे ही वनस्पतीही नामशेष होणार की काय अशी शास्त्रज्ञांना भीती वाटते. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत, पण त्यांच्या कुठल्याच प्रयत्नांना अजूनपर्यंत तरी यश मिळालेले नाही.







