गेल्या काही दिवसांत बाजारपेठांतील व्यापार हळूहळू सुरळीत होण्याच्या मार्गावर आहेत. अर्थात ही सुरुवात अडखळत होते आहे यात शंका नाही. जगातले सर्वच देश कोवीडच्या तडाख्यात सापडलेले असल्याने देशी-परदेशी चलन बाजारात फार मोठे वादळ आलेले नाही. परंतु कोवीडची वावटळ जोमात होती त्या काळात मौल्यवान धातूंचे भाव -म्हणजे सोन्या-चांदीचे भाव वाढतच होते. त्याला कारणही तसे होते. सोन्याचांदीचे भाव जगात त्या-त्या वेळी अस्तित्वात असलेल्या भीतीच्या प्रमाणात वाढत असतात. भीती जास्त तर भाव जास्त!
तांब्याचे वाढते भाव, पर्यावरण आणि पर्यायी उर्जा स्त्रोत यांचं नेमकं गणित काय आहे?


सर्वसामान्य जनतेची संकटकाळी आधार असलेल्या सोन्याचांदीच्या भावांवर नजर असते. तुम्ही बघितलं असेलच, लस बनवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाल्यावर या मौल्यवान धातूंचे भाव घटत गेले. पण आजच्या आमच्या लेखाचा विषय सोने-चांदी नसून दिवसेंदिवस वाढत जाणारे तांब्याचे भाव हा आहे. आपल्यासारख्या सर्वसामान्यांचा तांब्याच्या भावाशी काय संबंध हे समजून घ्यायचे असेल तर हा लेख पूर्ण वाचायला हवाच!
सोबत दिलेला तांब्याच्या भावाचा आलेख बघा.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला ५२० रुपयांच्या आसपास असलेला भाव गेल्या दोन महिन्यात ७२० रुपयांच्या वर गेला आहे. 'मेटल मार्केट'मध्ये हा भाव फरक फार मोठा समजला जातो कारण तांबे टनावारी विकले जाते. ही भाववाढ फक्त भारतातच होते आहे असे नाही, तर जागतिक बाजारातच तांब्याचा भाव तेजीत आहे. याची कारणे अनेक आहेत. पहिले महत्वाचे कारण असे आहे की जगभरात तांब्याचे उत्पादन करणार्या तांब्याच्या खाणी फारच थोड्या देशात आहेत.
सोबत दिलेल्या आलेखात दिलेली यादी पाहिली तर ते लक्षात येईल की यातले बरेचसे देश अमेरिका-ऑस्ट्रेलिया- आफ्रिका खंडात आहेत. आशियात आणि विशेषत: भारतात तांब्याचे उत्पादन फारसे होत नाही. त्यामुळे आपण तांबे विकत घेण्यासाठी बाहेरच्या देशांवर अवलंबून आहोत.

आता सध्या काय घडते आहे ते बघू या !
कोवीडचा प्रभाव जसजसा कमी होतो आहे त्या प्रमाणात औद्योगिक हालचाली मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या वर्षभरात झालेले नुकसान लवकरात लवकर भरून काढण्याच्या प्रयत्नात सर्वच कारखानदार आहेत त्यामुळे तांब्याचे दबलेले भाव अचानक उसळले आहेत. असा सर्वसाधारण समज आहे खरा, पण हा समज अंशतः खरा आहे. परंतु या तेजीचे कारण भलतीकडेच लपले आहे ते आता समजून घेऊ या !
कोवीडच्या साथीने संपूर्ण विश्वात एक धोक्याची सूचना घणघणते आहे आणि त्यावर उपाय एकच आहे 'निसर्गाकडे चला'. आतापर्यंत पर्यावरणाची जास्तीतजास्त हानी इंधनाच्या हव्यासापोटी झाली आहे. पेट्रोलियम असो वा कोळसा या दोन्ही उर्जास्त्रोतांची किंमत आता आपण मोजतो आहे. प्रत्येक देशाने आपला 'कार्बन फूटप्रिंट' (कार्बन उत्सर्जन) शक्य तितका कमी करायचा आहे. पण हे शक्य आहे का? भूतान आणि सुरीनाम या दोन छोट्या देशांनी हे करून दाखवलं आहे, पण इतर देशांना हे जमेल का ?

कार्बन फूटप्रिंट कमी करण्यासाठी टेस्ला सारखी इलेक्ट्रीकल व्हेइकल वापरणे आता गरजेचे झाले आहे, पण या गाड्यांमध्ये सध्याच्या गाड्यांपेक्षा ५ पट तांबे लागते. पेट्रोलवाल्या गाडीत २० किलो तांबे वापरले जाते तर टेस्ला सारख्या गाडीला ८३ किलो तांबे लागते. प्रत्येक चार्जींग स्टेशनला १० किलो तांब्याची गरज असते. २०५० सालापर्यंत ६ कोटी गाड्या रस्त्यावर येतील. आता तुम्हीच हिशोब करा किती तांबे लागेल ?
पर्यायी उर्जेसाठी सौर आणि पवन उर्जा हे दोन पर्याय आहेत, पण त्यासाठीही मोठ्या प्रमाणात तांब्याची गरज लागणार आहे. उदाहरणार्थ सोलर पॅनेलसाठी तांब्याचेच पत्रे लागतात. पवनचक्कीसाठी तर एक मेगा वॅट क्षमतेसाठी ५ टन तांबे लागते. (ऑफशोअर विंडमिलसाठी १५ टन तांबे लागते !!)
थोडक्यात तांब्याचे भाव दिवसेंदिवस वाढत जातील असा अंदाज आहे !

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुमचा आमचा काय संबंध ?
प्रत्यक्ष संबंध नाही हे खरं आहे पण पर्यायी ऊर्जेचा मार्ग आपल्याला दिसतो तसा सोपा आणि स्वस्त नाही. क्लीन एनर्जीच्या पाठपुराव्यात तांब्यासारखा वाहक धातू कमी पडू शकतो याचा आजवर कोणी विचार केलेला दिसत नाही. सोबतच टेस्ला सारख्या गाड्यांना लागणारा लिथियम हा धातू शुद्ध करून वापरणे, या दोन्ही गोष्टी पर्यावरणास मारक आहेत. ग्राहकाच्या दृष्टीने बघितले तर उर्जेची किंमत या ना त्या रुपात वाढत जाणार आहे. साहजिकच ऊर्जेची उधळपट्टी आपल्याला परवडणार नाही.
टॅग्स:
संबंधित लेख

जेव्हा अनिल कुंबळेने इंग्लिश गोलंदाजांना रडवत इंग्लंडमध्येच झळकावले होते शतक!! वाचा तो किस्सा..
११ ऑगस्ट, २०२२
लिस्टिकलया ट्रॅव्हेल फोटोग्राफरने टिपलेला भारत तुम्हीही पाहिला नसेल....पाहा हे १५ फोटो!!
२८ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलघरासाठी भांडी खरेदी करताय? मग हे वाचलंच पाहिजे!!
१२ ऑक्टोबर, २०२१
लिस्टिकलरोनाल्डो स्वगृही...मँचेस्टरमध्ये रोनाल्डोचं पुनरागमन काय सूचित करतं??
२८ ऑगस्ट, २०२१