आज आपल्याला गूगल म्हणजे सबकुछ वाटतं. नव्या पिढीला तर गूगल पलिकडे काही असेल असे वाटतही नसेल. अर्थात गूगलनं ज्या पद्धतीनं आपलं आयुष्य व्यापलं आहे, ते पाहता त्यात काही चूकही नाही. पण एकेकाळी असंच गारूड याहू!नं लोकांच्या मनावर केलं होतं. त्यात "याहू!" नावामुळे भारतीयांना जरा जवळचंही वाटायचं. अर्थात तसा याहू! कंपनीचा आणि शम्मी कपूरांचा काही संबंध नव्हता. पण तेही तंत्रज्ञानाचे चाहाते होते आणि याहू!ने मुंबईतल्या ऑफिसच्या उद्घाटनाला शम्मींना आमंत्रित केले होते.
असो. आजही तिशी ओलांडलेल्या लोकांना त्यांचे याहूचे दिवस आठवत असतील. काहींचा पहिला इमेल आयडी याहूचा असेल. याहू चॅटरूम्स, ASL म्हणजे त्याकाळचे "J1 झाले का?", याहूग्रुप्स हे सगळं स्वच्छ आठवत असेल. पण काळाबरोबर काही गोष्टींच्या जागा नव्या गोष्टी घेतात. तसं याहू!चंही झालं आहे.






