अखेर सरकारने लोकांच्या दडपणाला बळी पडून मार्शल लॉ हटवला. आता बेनझीरला वाटलं, आपल्याला थोडे बरे दिवस येतील. एका नव्या पाकिस्तानची ती स्वप्नं बघू लागली. दरम्यान तिचं असिफ अली झरदारी याच्याशी लग्नही झालं. १९८८ मध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्यात पाकिस्तान पीपल्स पार्टीला विजय मिळाला. २ डिसेंबर १९८७ या दिवशी बेनझीर भुत्तो पाकिस्तानची पहिली महिला पंतप्रधान बनली.
इंग्लंडमध्ये शिक्षण झाल्यामुळे बेनझीर आंग्लाळलेली होती. उर्दूपेक्षा तिचं इंग्लिशवर जास्त प्रभुत्व होतं. तिचं एकंदरीत इंग्रजाळलेलं व्यक्तिमत्व कट्टरपंथी इस्लामी लोकांच्या नजरेत खुपत होतं. त्यामुळे ती आणू पाहत असलेल्या सुधारणांनाही कट्टरपंथीयांनी कायम विरोध केला.
दुसऱ्या बाजूला तिची पंतप्रधानपदाची कारकीर्दही वादग्रस्त ठरली. सरकारवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले. आसिफ अली झरदारी यांना कोणत्याही कामाबद्दल दहा टक्के कमिशन देण्याचा प्रघात पडून गेला होता. शिवाय त्यावेळच्या मंत्रिमंडळात आणि महत्त्वाच्या पदांवर बेनझीरने स्वतःच्या कुटुंबीयांची आणि नातेवाईकांची वर्णी लावली होती. बेनझीर सत्तेत आली तेव्हा आधीच्या सरकारने देशाचं मोठ्या प्रमाणावर इस्लामीकरण केलं होतं. बेनझीरने याला विरोध केला. हे अर्थातच अनेक जणांना रुचलं नाही. कडव्या मूलतत्त्ववाद्यांना तर नाहीच नाही. वास्तविक देशात जास्तीत जास्त सुधारणा आणण्याचा बेनझीरचा उद्देश होता. पण त्याला यश मिळणार नाही अशी चिन्हं दिसत होती.