आपली पृथ्वी गोल आहे, त्यामुळे प्रत्येक देशात सूर्योदय होण्याची वेळ वेगवेगळी असते. म्हणजे कधी कुठल्या देशात रात्र असेल तर कुठे दिवस. आता सूर्यावर कुठल्या देशाचे नियंत्रण नसले तरी आपआपल्या देशातील घड्याळाचे नियंत्रण मात्र या देशांकडेच आहे. सर्व देश आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेनुसार आपली वेळ ठरवतात.
ही आंतरराष्ट्रीय दिनांक रेषा पृथ्वीच्या मध्यातून जाते असे मानले जाते. समोआ आतापर्यंत या रेषेच्या पूर्वेकडे होता, तो २९ डिसेंबर २०११ नंतर रेषेच्या पश्चिमेकडे सरकला. हे कसे केले गेले? तर २९ डिसेंबर २०११ रोजी जेव्हा घड्याळात रात्रीचे बारा वाजले तेव्हा सुमोआने आपले कॅलेंडर बदलले. दुसरा दिवस ३० डिसेंबर घेण्याऐवजी थेट ३१ डिसेंबर घेतला आणि २३ तासांनी आपले घड्याळ पुढे घेतले. आता प्रश्न उरतो सुमोआने असे का केले? सुमोआला भविष्यात जाण्याची इतकी घाई का होती?
न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चीन या देशांशी सुमोआचा व्यापार चालतो, ज्या दिवशी सुमोआमध्ये रविवार असेल आणि सार्वजनिक सुट्टी असेल त्या दिवशी न्युझीलंडमधील सार्वजनिक सुट्टी संपून कामकाम सुरु झालेले असे. न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, चीन हे देश आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेच्या त्या बाजूला, तर सुमोआ आंतरराष्ट्रीय दिनांक रेषेच्या या बाजूला असल्याने त्यांच्या घड्याळात तब्बल २३ तासांचे अंतर पडत होते. यामुळे त्यांच्या व्यापारात आणि व्यवहारातही खूप मोठा गोंधळ उडत असे. यावर उपाय म्हणून सुमोआचे तत्कालीन पंतप्रधान टुएलिपा मॅलील्गोई यांनी आपले कॅलेंडर एक दिवसांनी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.