आम्ही जातो अमुच्या गावा -रघुराम राजन अमेरीकेत परत जाणार-तेरी दुनियासे हो के मजबूर चला

आम्ही जातो अमुच्या गावा -रघुराम राजन अमेरीकेत परत जाणार-तेरी दुनियासे हो के मजबूर चला

रिझर्व बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज "अमेरिकेत परत जाण्याचा " मनोदय व्यक्त करून एक मोठा धक्का दिला आहे.

गेले काही महिने राजन यांच्या वक्तव्यांना " शेरेबाजी "चे स्वरुप देण्यात येऊन त्यांच्या विरुध्द प्रचाराची आघाडीच उघडण्यात आली होती.

अर्थात अर्थमंत्री अरुण जेटली यांचे अंदाजपत्रकीय भाषण ज्यांनी कान देऊन ऐकले असेल त्यांना "राजन परत जाणार " यांची कुणकुण आधीच लागली होती.

रघुराम राजन यांनी  वारंवार आपल्या भाषणातून भारत अद्यापही आर्थिक संकटातून बाहेर पडला नसल्याचे सांगितले होते.विशेषतः विकासदराच्या बाबतीत आपली स्थिती " अंधो में काना राजा " अशी आहे हे त्यांचे वक्तव्य "शेरेबाजी"चे लेबल लावून मिडीयात धुरळा उडवण्यात त्यांचे विरोधक सफल झाले.

गेल्या महिन्यात सुब्रमण्यन स्वामी यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून " राजन हटाव" मोहीम आणखीच तीव्र केली होती.सरतेशेवटी आज रिजर्व बँकेच्या कर्मचार्‍यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रात त्यांनी आपला निर्णय जाहीर करून महिनाभर चाललेल्या कुजबुजीला विराम दिला आहे. सामान्यतः रिजर्व बँकेच्या गवर्नरांचा जनसामान्यांशी थेट संपर्क कधीच होत नसतो त्यामुळे या निर्णयाचे गांभीर्य जनतेच्या तत्काळ येणे कठीण आहे.परंतु ज्यांचा आर्थिक विश्वाशी संपर्क आहे ते इतकेच म्हणतील की,


"येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करशी अनेक?
हे,मूर्ख यांस किमपिही नसे विवेक
कोकीळ वर्ण बघूनी म्हणतील काक."