फार पूर्वी मुंबईच्या शेअर बाजारात एक शब्द फारच फेमस होता तो म्हणजे 'ठसी' ! आता 'ठसी' म्हणजे काय तर एखाद्या सौद्यात भरपूर नफा कमवून तो इतरांच्या लक्षात येण्याआधीच कुठेतरी सुरक्षित जमा करून ठेवणं ! ज्याला इंग्रजीत salt away असं ही म्हणतात.एकूण या शब्दाचा अर्थ असा की जमा झालेल्या पैशांचा कोणालाही मागमूस न लागू देता ते सुरक्षित स्थळी हलवून ठेवणं !
आता तुमच्याआमच्या सारखी सामान्य माणसं आयुष्यात ठसी करून करणार ? पण राजकारणी नेते- कलाकार - खेळाडू -नटनट्या यांची गोष्टच वेगळी असते. त्यांच्याकडे पैसे येतात तेव्हा धबधब्यासारखे कोसळून येतात आणि आटले तर कोरडा ठणठणाट ! याचे कारण असे असते की त्यांची कमाईची वर्षं मर्यादीत असतात.अशा वेळी त्यांचे कर सल्लागार - आर्थिक सल्लागार त्यांना 'ठसी' करण्याचा सल्ला देतात. ही ठसी मात्र अगदी कोणाच्याही नकळत सातासमुद्रापलीकडे - हो, अगदी खर्या अर्थाने सातासमुद्रापलीकडे करून ठेवण्याचा सल्ला देतात. हे सातासमुद्रापलीकडे म्हणजे कुठे तर शून्य कर असलेली- अत्यंत गुप्तता पाळणारी- असे काही देश आहेत जिथे हे पैसे सुरक्षित हलवून ठेवता येतात.तिथे जे खातं उघड्लं जातं त्याला -ऑफ शोअर एन्टीटी- असं म्हटलं जातं.



















