१०० शतके झळकावणारा सचिन सर्वांना माहितेय मात्र भारतासाठी पहिले शतक कोणी झळकावले माहितेय का? घ्या जाणून..

१०० शतके झळकावणारा सचिन सर्वांना माहितेय मात्र भारतासाठी पहिले शतक कोणी झळकावले माहितेय का? घ्या जाणून..

आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे ज्याने १०० शतके झळकावण्याचा पराक्रम केला आहे. तर सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहली हा दुसऱ्या स्थानी आहे. विराटने आतापर्यंत एकूण ७३ शतके झळकावली आहेत. अनेकांना असे देखील वाटत आहे की, विराट कोहली सचिनचा सर्वाधिक शतके झळकावण्याचा विक्रम मोडून काढू शकतो. मात्र आज आपण सर्वाधिक शतके कोणी झळकावली याबाबत नाही तर पहिले शतक कोणी झळकावले याबाबत बोलणार आहोत. कारण सुरुवात ही नेहमीच खास असते. त्यामुळे भारतीय संघासाठी पहिले शतक कोणी झळकावले याबाबत अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. 

भारतीय क्रिकेटसाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. कारण आजच्याच दिवशी भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमधील पहिला शतकवीर फलंदाज मिळाला होता. आजच्याच दिवशी म्हणजे १७ डिसेंबर १९३३ रोजी दिग्गज भारतीय फलंदाज लाला अमरनाथ यांनी भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पहिले वहिले शतक झळकावले होते. सामन्याचं ठिकाण होतं मुंबई. तर विरोधी संघ होता क्रिकेटचा जन्मदाता इंग्लंड संघ. हा सामना भारतीय संघाने ९ राखून गमावला.मात्र लाला अमरनाथ यांनी असं काही करून दाखवलं जे यापूर्वी कुठल्याही भारतीय फलंदाजाला करता आलं नव्हतं. 

भारतीय संघाने या प्रथम फलंदाजी करताना २१९ धावांचा डोंगर उभारला होता. तर इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत ४३८ धावा केल्या होत्या. यासह इंग्लंड संघाने २१९ धावांची आघाडी घेतली होती.धावांचा पाठलाग करताना अवघ्या २१ धावांवर २ भारतीय फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतर लाला अमरनाथ हे संकटमोचक म्हणून भारतीय संघासाठी फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आले. कसोटी क्रिकेटमध्ये अवघ्या ११७ मिनिटांमध्ये त्यांनी आपले शतक पूर्ण केले. त्यांनी एकूण १८५ मिनिटेफलंदाजी करत ११८ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. हा त्यांचा पहिला कसोटी सामना देखील होता. यासह ते पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकावणारे पहिले भारतीय फलंदाज ठरले होते.

टॅग्स:

sachin tendulkar

संबंधित लेख