निवडणूका,मग त्या कोणत्याही देशातील असोत त्याभोवती काही ना काही वाद सुरु होतोच. आता हेच पहा ना १९९९ साली सोव्हिएत युनियनमधून स्वतंत्र झालेला इस्टोनिया नावाचा एक छोटासा देश आहे.तिथे यावर्षी राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणुका होताहेत. देशाचे एवढे मोठे पद पण यासाठी या देशाला फक्त एकच उमेदवार लाभला आहे. निवडणूकीला जर एकच उमेदवार उभा राहणार असेल तर जनतेने मत कुणाला द्यायचं? त्याच उमेदवाराला? इथपासून ते मग निवडणूक घ्यायचीच कशाला? इथपर्यंत या निवडणूकीने अनेक प्रश्न उभे केले आहेत. इस्टोनियाच्या राजकारणातील हा पेचप्रसंग नेमका आहे तरी काय? चला समजून घेऊया.
खरे तर इस्टोनियाच्या तीस वर्षांच्या वाटचालीतील हा पहिलाच असा प्रसंग आहे जिथे राष्ट्रपतीपदासाठी योग्य उमेदवारच मिळत नाहीये. यामागचं कारण म्हणजे इस्टोनियाच्या निवडणूक पद्धतीतील नियमानुसार राष्ट्रपती पदासाठी अर्ज भरणाऱ्या उमेदवाराला किमान संसदेतील २१ संसद सदस्यांचं तरी बहुमत मिळायला हवंय आणि अशी बहुमत मिळवणारी अलर कॅरीस ही एकमेव व्यक्ती आहे. शनिवारपर्यंत तरी राष्ट्रपती पदाच्या या निवडणूकीसाठी कुणी अर्जच भरला नव्हता कारण किमान २१ संसद सदस्यांचा पाठिंबा मिळवण्यातही हे लोक अपयशी ठरले आहेत.



