गेल्या कित्येक वर्षांपसून जेनेटिक सायंटिस्ट्सचा वाद सुरू आहे. कुत्रे हे नेमके केव्हा माणसाळले?
एका बाबतीत त्यांचं एकमत आहे आणि ते म्हणजे कुत्र्यांचे पूर्वज हजारो वर्षांपूर्वी लांडग्यांपासून वेगळे झाले. म्हणजे कुत्र्यांचं मूळ लांडग्यांत आहे हे खरं, पण ही प्रक्रिया नेमकी केव्हा आणि कुठे झाली याबद्दल त्यांच्यात एकमत होऊ शकलेलं नाही. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कुत्र्यांचे पुरातन सांगाडे मिळण्यात आलेलं अपयश. त्याचप्रमाणे जगभरातील कित्येक जनावरांच्या जीन्सचा अभ्यास अजून पूर्णत्त्वाला गेलेला नसल्यामुळे या आणि अशा विषयांचा तुलनात्मक अभ्यास कोणत्याही निष्कर्षांपर्यंत घेऊन जाण्यास असमर्थ ठरतो.
शास्त्रज्ञांना काही वर्षांपूर्वी जर्मनीमध्ये १६००० वर्षांपूर्वीचा कुत्र्याचा सांगाडा सापडला होता. त्यावरील संशोधनानंतर शास्त्रज्ञांच्या एका गटाने लांडग्यांपासून कुत्र्यांची निर्मिती सर्वप्रथम युरोपात झाली आणि कुत्रे सर्वप्रथम युरोपातच पाळले गेल्याचा निष्कर्ष जाहिर केला. मात्र या सांगाड्यातील कुत्र्याच्या जीन्समध्ये आणि सध्याच्या युरोपियन कुत्र्यांच्या जीन्समध्ये आढळलेल्या तफावतीमुळे प्रश्न पूर्णपणे सुटणे शक्य झाले नाही.
आयर्लंडधील न्यूग्रेन्ज येथिल उत्खननात लॉरेन्ज फ्रान्झ या शास्त्रज्ञांना सुमारे ५००० वर्षांपूर्वीच्या कुत्र्याचा सांगाडा सापडला. या सांगाड्याच्या कानातील एका हाडामधून जीन्स मिळवण्यात आले आणि तत्कालीन कुत्र्यांचा संपूर्ण जीनोम प्रकाशित करण्यात आला. बरोबरच जगभरातील सहाशेंच्या वर कुत्रे आणि लांडग्यांच्या रक्तातून त्यांचा जीनोम वेगळा काढून त्यांची तुलना न्यूग्रेन्झ मधल्या कुत्र्याच्या जीनोमशी केली असता शास्त्रज्ञांना त्याचं मूळ आशियाई कुत्र्यांमध्ये आढळलं.
यावरून सध्या शास्त्रज्ञांमध्ये असा मतप्रवाह निर्माण झाला आहे जो मानतो की लांडग्यांपासून कुत्र्यांना वेगळं होऊन त्यांच्या माणसाळवण्याची प्रक्रिया युरोप आणि आशिया या दोन्ही जागांमध्ये एकाच वेळी झालेली असू शकते किंवा ज्याप्रमाणे मानवांच्या स्थलांतराचा पॅटर्न दिसतो त्याप्रमाणे त्यांच्यासोबत कुत्रेही स्थलांतरित झाले असावेत. त्यामुळे ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालल्यामुळे असे दोन तट पडले असावेत. अर्थात कोणताही निष्चित निष्कर्ष निघण्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणावर तुलनात्मक अभ्यास आवश्यक आहे यावर सर्वच शास्त्रज्ञांची सहमती आहे.
एकाहून अधिक वेळा झालेली कुत्र्यांच्या माणसाळण्याची प्रक्रिया मोठा गुंता सोडवू शकते. या अनुषंगानेच मांजरी आणि डुकरांच्या माणसाळण्याच्या काळाचा अभ्यास शास्त्रज्ञांना महत्त्वाचा वाटतो. त्यांच्यामध्येही एकाहून अधिक वेळा ही प्रक्रिया झालेली असण्याच्या शक्यतेवर सध्या ते विचार करत आहेत. एकूणच जेनेटिक सायन्सच्या अभ्यासाद्वारे मानव आणि तत्संबंधित प्राणीवंशाची कोडी सुटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे, हे निश्चित.
