माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. तो वेळोवेळी वेगवेगळे सिद्धांत मांडत असतो. काही खरे ठरतात, काही दावे अगदी हास्यास्पद ठरतात आणि बर्म्युडा ट्रँगलसारख्या काही गोष्टी कायमचं रहस्यमय गूढ बनून राहतात. या वैचारिक भूमिकेमुळे माणूस नैसर्गिक आपत्तींचा सबंध निसर्गाच्या इतर अनेक घडामोडींशी जोडणं हा मानवी स्वभाव आहे. उदाहरणार्थ सूर्य अथवा चंद्र ग्रहणाचा संबंध त्या ग्रहणानंतर येणार्या आपत्तींशी जोडला जातो. तसे पाहिले तर निव्वळ अशास्त्रीय संबंध जोडून मनाचे समाधान करून घेणे या पलीकडे या तर्कांना फारसे महत्व नसते. पण काही वेळा हे सत्य असू शकेल इतपत संख्यात्मक पुरावे पण हाताशी येतात.
आता सध्याच्या परिस्थितीचा आपण विचार करू या. हे कोविडचे विषाणू आले कुठून? तर त्याला निश्चित उत्तर कोणाकडेच नाही. त्यामुळे ते अमुक एका देशाने बनवले असतील आणि नंतर प्रकरण हाताबाहेर गेल्याने संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे अशी बर्याचजणांची ठाम समजूत असेल. याला कॉन्स्पिरसी थिअरी असे म्हणण्यापलीकडे काहीच महत्व नाही. शास्त्रज्ञांना पण असेच प्रश्न बुचकळ्यात टाकतात. ते त्याची शास्त्रीय उत्पत्ती शोधतात. काहीवेळा शक्यतेच्या सीमारेषेपर्यंतही ते पोहचतात. तर विषाणू आले कुठून हा प्रश्न जेव्हा त्यांना पडला, तेव्हा त्यांनी संशोधनाची दिशा बदलून बघितली. त्यातून एक नवीन शक्यता त्यांना दिसली की आपल्याला वेठीस धरणारे हे व्हायरस कदाचित अंतराळातून आले असावेत. म्हणजे पृथ्वीच्या बाहेरून, अवकाशातून, ब्रह्मांडाच्या कुठल्यातरी अनोळखी कोपर्यातून हे विषाणू आले असावेत. या शास्त्रज्ञांमध्ये हॉयल आणि विक्रमसिंघे या शास्त्रज्ञांनी बरेच कार्य केले आहे. आजच्या लेखात त्यांच्या आणि त्यांच्या सिध्दांताचा पाठपुरावा करणार्या अनेकांचे विचार काय आहेत ते वाचू या!!









