तर जंगलातून बाहेर पडलेले बिबटे स्वतःच्या अस्तित्वासाठी जगत होते. ऊसशेती प्राधान्यित क्षेत्रात बिबट्याने आपला अधिवास बनवला. कारण ऊस हे पीक तसे घनदाट. त्यामुळे लपण्यासाठी योग्य जागा, संपूर्ण पीकवाढीसाठी लागणारा १ वर्षाचा कालावधी, या कालावधीत क्वचित शेतीकडे येण्याचा लोकांचा कल. त्यात भर म्हणजे शेतीला दिल्या जाणाऱ्या पाण्यामुळे बिबट्याची तहान तर भागेलच!! त्यात भक्ष्य म्हणजे उसाला नुकसान पोहोचवणारे घूस, साळींदर, रानडुक्कर हे प्राणी त्याला शेतीजवळ आयते भक्ष्य मिळत गेले. त्यामुळे उसाच्या शेतात, जवळच्या माळरानावर त्याने आपला अधिवास बनवला. काही काळाने लोकांनी रानडुक्कर, साळींदर ससे अशा प्राण्यांची अवैध शिकार करणे सुरू केली. यामुळे अजून भक्ष्याची कमतरता भासू लागल्याने बिबट्याने आपला मोर्चा शहरी भागात वळवला. कारण इथे मोठ्या प्रमाणात भटकी कुत्रे होते, सोबतच डुक्करेही असत. बिबट्याने अशा प्राण्यांना भक्ष्य बनवणे सुरू केले. कारण हे प्राणी शिकारीलासुद्धा सोप्पे होते. अशा प्रकारे बिबट्या मानवी वस्तीजवळ पोहोचला. (वास्तविक मानवाने बिबटय़ाच्या वस्तीत प्रवेश केलाय ).
आधी लिहिल्याप्रमाणे बिबट्या हा लाजाळू आणि निशाचर आहे. तो आपल्या आसपासच्या परिसरात वावरतो, राहतो. पण क्वचित प्रसंगी तो आपल्या निदर्शनास पडतो. मग लगेच आपण वनविभागाला कळवणार, त्या बिबट्याला पकडण्यासाठी दबाव आणणार, मग नाईलाजाने का होईना त्या बिबट्याला पकडले जाते. पण मित्रांनो, त्या भागातील बिबट्या जेरबंद केला म्हणजे हा संघर्ष ही संपला असा मुळीच नाही. अशाने मानव-बिबट्या संघर्षाला नवे फाटे कसे फुटतात कसे ते आपण पाहूया..
प्रत्येक प्राण्यांचा एक अधिवास क्षेत्र असतो, त्याला आपण territory म्हणतो. या टेरिटरीवर फक्त एकाचे वर्चस्व असते. तिथल्या बिबट्याला जेरबंद केल्यास रिकाम्या झालेल्या टेरिटरीवर आपलं वर्चस्व करण्यासाठी तिथे आजूबाजूच्या टेरिटरीमधील दुसरे बिबटे येतातच. मग त्यांच्यामध्ये या टेरिटरीसाठी संघर्ष होतो, म्हणजे एका बिबट्याला जेरबंद करून दुसऱ्यांना आयते निमंत्रण केले असे म्हणायला काही हरकत नाही.