शारीरिक पातळीवरचं वेदनादायी आणि तितकंच उत्कंठावर्धक असं धाडस संपलं, मात्र मानसिक स्तरावरची आव्हानं कायम होती. या प्रयोगाला हरकत घेणारे, तो करणं कसं धोकादायक आहे हे वारंवार निक्षून सांगणारे सगळेच जण त्याच्या विरोधात उभे राहिले होते. अगदी डॉक्टर श्नायडरलाही म्हणावी तितकी खात्री नव्हती. मात्र स्वत:वर हाच प्रयोग पुन्हा पुन्हा केलेल्या डॉक्टर फोर्समनला ही कॅथेटरची प्रोसिजर सुरक्षितपणे करता येऊ शकते असा आत्मविश्वास होता. त्याने एक्स-रे च्या मदतीने याचा पुरावाही दिला. या संपूर्ण प्रवासात त्याला केवळ एका डॉक्टरची साथ लाभली. त्याच्यावर विश्वास दाखवणाऱ्या डॉक्टरचं नाव होतं अर्न्स्ट उनगेर. याचं कारण म्हणजे त्यानेही या प्रकारचा प्रयोग यापूर्वी केलेला होता, पण तेव्हा तो आपला दावा सिद्ध करण्यासाठी पुरावा देऊ शकला नव्हता. बाकी दुनिया फोर्समनला हसत होती, त्याची टवाळी करत होती आणि त्याचे प्रयोग कसे अचाट, निरुपयोगी आणि धोकादायक आहेत हे सिद्ध करू पाहत होती. फोर्समनने मात्र आपलं काम सुरू ठेवलं. त्याने स्वतःबरोबरच ससे आणि कुत्री यांच्यावर प्रयोग करून कॅथेटर ऍन्जिओग्राफी म्हणजेच कॅथेटरच्या साह्याने रक्तवाहिन्यांमध्ये किती ब्लॉक्स आहेत किंवा त्या कितपत अरुंद झाल्या आहेत हे शोधण्याच्या तंत्रातले कच्चे दुवे शोधून काढले. त्याने कॅथेटरायझेशनचं अजून एक तंत्र विकसित केलं. यात जांघेजवळ छेद देऊन त्यातून कॅथेटर आत घातला जाई. मांडीजवळच्या फीमरल व्हेन या रक्तवाहिनीच्या मदतीने हृदयाशी संलग्न असलेल्या इन्फिरियर व्हेना काव्हा या व्हेन पर्यंत पोहोचणं शक्य होई.
एका विशिष्ट मर्यादेनंतर मात्र फोर्समन थांबला. त्याला तसं करणं भागच होतं. आधीच त्याने स्वतःच्या शरीरावर भरपूर प्रयोग केले होते. आता त्याला थोडा ब्रेक लावणं आवश्यक वाटलं असावं त्याला. शिवाय त्याच्या त्या प्रयोगांदरम्यान वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांचे अनुभवही त्याच्यासाठी फारसे चांगले नव्हते. अखेर कार्डिओलॉजीला रामराम ठोकत त्याने एका छोट्या गावात युरॉलॉजिस्ट म्हणून काम सुरू केलं.